देश

लोकसभेत आज होणार अत्यंत महत्त्वाचा निर्णय! BJP चा ‘थ्री लाइन व्हीप’ जारी; तर शिंदेंच्या लेकानेही…

‘एक देश, एक निवडणूक’ घटनादुरुस्ती (One Nation One Election Bill) आज लोकसभेत सादर होणार आहे. देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडली जाणार आहे. याचसंदर्भात सत्ताधारी पक्षांकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना ‘थ्री लाईन व्हीप’ बजावला आहे. सर्वांनी मंगळवारी लोकसभेत हजर रहायचं असल्याचं भाजपाकडून खासदारांना सांगण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये, ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक मंजुरासाठी पटलावर ठेवल जाणार आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत.

सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या विधेयकाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची योजना आखली आहे. गेल्या गुरुवारी, मोदी सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आणि भारतात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या कायद्याशी संबंधित विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलं होतं. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळानं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती.

‘थ्री लाईन व्हीप’ म्हणजे काय?
व्हीप हा सदर पक्षाच्या सभागृहातील प्रमुख नेत्याकडून जारी केला जातो. व्हीपचा अर्थ पक्ष आदेश असाही गृहित धरला जातो. व्हीपनंतरही गैर हजर राहणाऱ्यांवर निलंबनाची किंवा इतर कठोर कारवाई केली जाते. याचा पूर्ण अधिकार पक्षाला असतो. त्यातही ‘थ्री लाईन व्हीप’ हा अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात सभागृहात मतदान होणार असेल तर जारी केला जातो. एखादी गोष्ट हायलाइट करण्यासाठी त्याखाली अंडरलाइन केली जाते त्याचप्रमाणे तिनवेळा अधोरेखित करण्याइतका महत्त्वाचा विषय अशा अर्थाने जो व्हीप जारी केला जातो त्याला ‘थ्री लाईन व्हीप’ असं म्हटलं जातं. म्हणजेच अत्यंत मोठा निर्णय सभागृहात होणार असून पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मतदानासाठी तुमची उपस्थिती अनिवार्य आहे असं या व्हीपमधून सूचत करायचं असतं. भाजपाने हाच व्हीप जारी केला आहे.

श्रीकांत शिंदेंनीही शिवसेना आमदारांसाठी बजावला व्हीप
आज वन नॅशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत सादर होणार असल्याने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांनाही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेचे सर्व खासदार आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी संसदेत उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे लोकसभेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षाच्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

Related Articles

Back to top button