शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
देशभरात दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी प्रचाराला लागले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष जोरदार मैदानात उतरले आहेत. दिवाळी म्हटलं की, मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही शिवाजीपार्क कंदील आणि रोषणाईने सजलं असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय.
मनसेकडून लावण्यात आलेल्या कंदीलावर शिवसेना ठाकरे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा वाद पुन्हा एकदा रंगला आहे. या वादात मनसेने मोठं पाऊल उचलंय.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने काल घेतली. त्यानंतर एका रात्रीत शिवाजी पार्क परिसरातले बॅनर्स आणि कंदील काढण्यात मनसेकडून काढण्यात आले. या दीपोत्सवात लावण्यात आलेल्या कंदीलवर मनसे पक्षाचे इंजिन हे चिन्ह होतं. ज्यामुळे मनसेकडून आचारसंहितचे उल्लघंन केल्याचा आरोप झाला आहे.
‘उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हिंदू सणांना विरोध’
दरम्यान, ठाकरे गटाने दिपोत्सवावर आक्षेप घेतल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. जर हिरवे कंदिल लावले असते, तर विरोध केला असता का? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला असता का? भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका हिंदू सण विरोधी असल्याचे संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केलाय.