LPG Cylinder च्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार; महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election Result 2024) सातव्या टप्प्यानिमित्त मतदान प्रक्रिया सुरु असतानाच सामान्य नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण, वाढत्या महागाईच्या या दिवसांमध्ये सामान्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेण्यात आला आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नवे दर लागू झाले म्हणजे आणखी पैसे भरावे लागणार का? हा चिंतातूर करणारा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर निश्चिंत व्हा. कारण, एलपीजी सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय तेल उत्पादन कंपन्यांनी घेतला आहे.
IOCL च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशभरात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरातील एलपीजीचे दर कमी करण्यात आले असून, मुंबईपासून दिल्ली आणि चेन्नईपर्यंत आता नवे दर लागू करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच हा निकाल लागण्याआधी सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली. नव्या बदलांनुसार आता 19 किलो वजनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरमध्ये मुंबईत 69.50 रुपये, चेन्नईत 70.50, कोलकाता येथे 72 रुपये आणि दिल्लीमध्ये 69.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर
जून महिन्यात केंद्राच्या वतीनं सलग तिसऱ्यांदा एलपीजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अशीच दिलासादायक बातमी समोर आली होती. ज्यानंतर लागोपाठ दोन महिन्यांमध्ये एलपीजी आणखी स्वस्त झाल्यामुळं अनेकांसाठीच हा मोठा दिलासा ठरला.
नव्या निर्णयानुसार आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 1745.50 रुपयांवरून 1676 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, मुंबईमध्ये हे दर 1698.50 रुपयांवरून 1629 रुपयांवर आले आहेत. कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे 1787 आणि 1840 .50 असे सिलेंडरचे नवे दर लागू आहेत.
केंद्राच्या वतीनं निवडणूक निकालांआधी घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे असंच म्हणावं लागेल. दरम्यान व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाले असले तरीही घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे असल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या घडीला देशात घरगुती वापरातील 14.2 किलो वजनी सिलेंडरचे दर दिल्लीत 803 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये आणि कोलकाता येथे 829 रुपये इतके आहेत. उज्ज्वला लाभार्थींना या दरांमध्ये किमान 200 रुपयांची सवलत मिळतेय.