अपराध समाचारदेश

Pune Porsche Accident: तो बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! आरोपी मुलगा म्हणाला, ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..’

पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील असलेल्या विशाल अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाला ताब्यात घेतलं आहे. विशाल अग्रवाल ‘ब्रह्मा ग्रुप’चा मालक आहे. अपघात झाला त्यावेळेस गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अल्पवयीन असताना मुलाला गाडी चालवण्यास दिल्या प्रकरणी विशाल अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरमधून गुन्हे शाखेकडून विशाल अग्रवालला अटक करण्यात आली.

अल्पवीयन मुलाने कबुली जबाबात काय म्हटलं?
या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने आपला जबाब नोंदवला आहे. वडिलांनीच आपल्याला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं या तरुणाने म्हटलं आहे. “मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही. वाहन चालविण्याचा परवानाही माझ्याकडे नाही. तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. त्यांनीच मला मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे,” असं या अल्पवीयन मुलाने पोलीस चौकशीत सांगितलं आहे. कल्याणीनगर घडलेल्या या पोर्शे कारच्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले.

बार आणि हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणामध्ये समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये अल्पवयीन मुलाने हॉटेलमध्ये मद्यपान केल्याचा दावा करणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सदर प्रकरणात हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या ‘हॉटेल कोझी’चे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ‘हॉटेल ब्लॅक’चे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावरुन राजकारण तापलं
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कल्याणी नगरमधील अपघातप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी केली आहे. ही घटना पुण्याच्या संस्कृतीला मारक असल्याचे सांगत अशा घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलं. पुण्यातील भाजपा, मनसेसह कोरेगाव पार्क रहिवासी समितीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आली, असं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. या अपघातानंतर अवघ्या 17 तासांच्या आत अल्पवयीन आरोपीला पुण्यातील सुट्टीच्या कोर्टानं जामीन मंजूर केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या कडेला कोणी गरीब वडापाव विकत असेल तर पोलीस रात्री 10 वाजता बंद करायला सांगतात.या पबमध्ये पहाटे पर्यंत दारू, ड्रग्स घेऊन नंगा नाच सुरु असतो. पोलिसांना हे दिसत नाही का? असा सवाल काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विचारला आहे. कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button