भारताच्या अंतराळ मोहिमेत आज आणखी एक सुवर्णक्षण जोडला जात आहे. इस्रोचे GSLV-F18 रॉकेट स्वदेशी रुबिडियम परमाणु घड्याळ असलेला ‘NVS-03’ उपग्रह घेऊन अंतराळात झेप घेणार आहे. देशाच्या संरक्षण आणि दळणवळण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्षेपणाचे थेट कव्हरेज आज रात्री 11:20 वाजल्यापासून इस्रोच्या सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आज, 30 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री ठीक 11:51 वाजता एक अत्यंत महत्त्वपूर्ण अंतराळ मोहीम फत्ते करण्यासाठी सज्ज झाली आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या (SDSC SHAR) दुसऱ्या लॉन्च पॅडवरून GSLV-F18 रॉकेटच्या साहाय्याने ‘NVS-03’ या अत्याधुनिक दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल. भारताची स्वतःची नेव्हिगेशन यंत्रणा अधिक भक्कम आणि अचूक बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
या मोहिमेसाठीचा अधिकृत 24 तासांचा काउंटडाऊन 29 ऑक्टोबर रोजी रात्री 11:51 वाजता सुरू झाला असून रॉकेट आणि उपग्रहाची सर्व तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे.
‘NavIC’ सिस्टिमने पुनरुज्जीवन आणि महत्त्व
भारताकडे स्वतःची प्रादेशिक नेव्हिगेशन सिस्टिम आहे, ज्याला NavIC (Navigation with Indian Constellation) किंवा IRNSS म्हणून ओळखले जाते. अमेरिकेच्या ‘GPS’ प्रणालीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने ही यंत्रणा विकसित केली आहे. कोणत्याही नेव्हिगेशन प्रणालीला स्वतंत्रपणे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी अंतराळात किमान 4 उपग्रह पूर्णपणे कार्यरत असणे आवश्यक असते. सध्या अंतराळात भारताचे 3 उपग्रह (IRNSS-1B, IRNSS-1I आणि NVS-01) सेवा देत आहेत. आज रात्री प्रक्षेपित होणारा 2,232 किलोग्रॅम वजनाचा ‘NVS-03’ सॅटेलाइट हा चौथा उपग्रह ठरेल, ज्यामुळे भारताची स्वतंत्र जीपीएस यंत्रणा अधिकृतपणे पूर्ववत सक्रिय होईल.
स्वदेशी परमाणु घड्याळाचे ऐतिहासिक तंत्रज्ञान
नेव्हिगेशन उपग्रहांच्या अचूकतेचा मुख्य आधार हा वेळेची सूक्ष्मता मोजणारी ‘परमाणु घड्याळे’ असतात. 2016 मध्ये भारताच्या पहिल्या पिढीतील उपग्रहांची घड्याळे निकामी झाली होती. यावर मात करत अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने (SAC) पूर्णपणे स्वदेशी रुबिडियम परमाणु घड्याळ विकसित केले आहे. NVS-03 उपग्रहामध्ये आयात केलेल्या घड्याळांसोबतच हे स्वदेशी तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे, जे नॅनोसेकंदापर्यंतची अचूक वेळ आणि स्थान निश्चित करेल.
आधुनिक उपकरणांशी सुसंगतता
या उपग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अस्तित्वातील L5 आणि S बँड सिग्नलसोबतच नवीन ‘L1’ फ्रिक्वेन्सी सिग्नलचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांचे आधुनिक स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि घालण्यायोग्य उपकरणांमध्ये NavIC चा वापर थेट आणि सहजतेने करता येणार आहे. या उपग्रहाची व्याप्ती भारताच्या मुख्य भूमीसह सीमाभागाच्या पलीकडे 1,500 किलोमीटरपर्यंत असेल.
खबरदारी
जानेवारी 2025 मधील ‘NVS-02’ मोहिमेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी आणि अपयशातून धडा घेत इस्रोने या उड्डाणात विशेष बदल केले आहेत. मिशन रेडीनेस रिव्ह्यू (MRR) कमिटीच्या सल्ल्यानुसार, रॉकेटच्या उड्डाणादरम्यान होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे इंधनाची वाहिनी अडकू नये म्हणून यावेळी ‘पायरो व्हॉल्व्ह’ (Pyro Valves) आधीपासूनच उघडे ठेवून उड्डाण करण्याची एक विशेष आणि वेगळी तांत्रिक रचना करण्यात आली आहे.
ISRO प्रसिद्धीपत्रकानुसार, 50 मीटर उंच आणि तीन टप्प्यांचे हे GSLV रॉकेट उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये स्थापित करेल. त्यानंतर उपग्रह स्वतःच्या इंधनाचा वापर करून पृथ्वीपासून साधारण 36,000 किमी उंचीवर स्थिर होईल.








