महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन-पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता. तर, काही ठिकाणी उष्णतेमुळं अंगाची लाही लाही होत आहे. आजही कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ झालीय. मागील दोन दिवसात उकाड्याची तीव्रता कमी होती. मात्र आता पुन्हा उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 37.2 तर कुलाबा येथे 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत दुपारनंतर विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असणार आहे.
मुंबईसाठी काय इशारा?
शनिवारी 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीतही 36 ते 37 अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले जाऊ शकते, असा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांनाही शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरणासाठी इशारा देण्यात आला आहे.
तापमानात वाढ का?
सध्या ईशान्य ते पूर्व पट्ट्यातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान चढे असून सुमद्रावरून येणारे वारे उशिराने वाहत असल्याने तापमानात वाढ झाली आहे.
चक्रीवादळाचा इशारा
बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे पुढे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं त्याचा परिणाम तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये होऊन 26 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.








