राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत आहे. ऐन पावसाळ्यात पिकं करपली, धरणाचा पाणीसाठा कमी झाला. एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असतानाच बँक कर्मचाऱ्यांचा असंवेदनपणा समोर आला आहे. शेगावच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
राज्यात भीषण असा दुष्काळ पडलेला असून संपूर्ण सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. रात्रदिवस सरकार दुष्काळावर मात करण्याच्या योजना आखत आहेत. शेतकरी, शेतमजूर त्रस्त आहेत. अशातच यंदा दुष्काळावर मात कशी करता येईल? गरीब,वृद्ध आणि शेतकरी या विचारात आहेत. मात्र बँक कर्मचाऱ्यांना राज्यातील दुष्काळाचं कुठलंही सोयर सुतक नाही.
एकीकडे संपूर्ण राज्य दुष्काळाशी लढत असताना दुसरीकडे मात्र कार्यालयीन वेळेत बँक कर्मचारी बँकेतच वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. एकीकडे दुरवरून खेड्यापाड्यावरून आलेले वृद्ध, शेतकरी व बँकेचे ग्राहक ताटकळत बसलेले असताना दुसरीकडे मात्र ब्रांच मॅनेजरच्या केबिनमध्ये कर्मचारी जमून जवळपास बर्थडे सेलिब्रेशन करत बसले.
हा धक्कादायक प्रकार घडला आहे शेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत. बँकेतील एका ग्राहकाने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केलाय. या प्रकारामुळे बँक कर्मचाऱ्यांना संवेदना नाहीत का? कार्यालयीन वेळेत कार्यालयात केक कापणे किंवा वाढदिवस साजरा करणे यावर बंदी असतानाही बँक कर्मचाऱ्यांना शेतकरी व आपल्या ग्राहकांप्रती कुठलीही संवेदना नाही का, असा संतप्त सवाल आता समोर येत आहे.







