‘ऑक्टोबर हीट’चा फटका रेल्वेलाही बसला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई आणि परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून या ‘ऑक्टोबर हीट’चा परिणाम मंगळवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला. अतिउष्णतेमुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्याने मंगळवारी (6 ऑक्टोबर रोजी) मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनवरील तीन रेल्वे स्थानकांच्या आवारात तातडीने 10 ते 15 मिनिटांचे आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आले. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले, तर काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
उष्णतेमध्ये मोठी वाढ
मंगळवारी दुपारी 12 वाजल्यानंतर उष्णतेमध्ये मोठी वाढ झाली. जमिनीलगतचे तापमान कमालीचे वाढल्याने रेल्वेचे रूळ प्रसरण पावण्यास सुरुवात झाली. ही स्थिती रुळांच्या देखरेख आणि देखभालीचे काम पाहणाऱ्या गँगमनच्या निदर्शनास आली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने मेन लाईनवरील परळ आणि दिवा तसेच ट्रान्स हार्बर लाईनवरील दिघा स्थानकाच्या आवारात ब्लॉक घेण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.
कुठे आणि कधी गाड्या थांबवल्या?
सर्वप्रथम परळ रेल्वे स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर दुपारी 12.30 ते 12.40 आणि नंतर पुन्हा दुपारी 1.05 ते 1.15 या वेळेत ब्लॉक घेऊन रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर दिवा स्थानकात डाऊन धीमा मार्गावरच दुपारी 1.38 ते 1.53 या वेळेत 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर लागोपाठ दोन ब्लॉक घेतल्यामुळे डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. ब्लॉक काळातील काही लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
ट्रान्स हार्बरवर 16 मिनिटे ब्लॉक
ट्रान्स हार्बर लाईनवरील दिघा रेल्वे स्थानकाच्या क्षेत्रातील रुळांवरही अतिउष्णतेचा परिणाम झाला. रूळ अचानक प्रसरण पावल्याचे निदर्शनास येताच सतर्कता बाळगण्यात आली आणि तातडीने दुपारी 2.09 ते 2.25 या वेळेत 16 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकचा ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला. उन्हाची तीव्रता अचानक वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे तातडीचे ब्लॉक्स घ्यावे लागले. रुळांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम पूर्ण केले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अतिउष्णतेमुळे रेल्वे रूळ प्रसरण पावल्याने काय होऊ शकतं?
रुळांना प्रसरण पावण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही, तर त्यांच्यावर प्रचंड दाब निर्माण होतो. यामुळे रूळ बाजूला सरकतात किंवा नागमोडी आकारात वाकडे होतात. वाकड्या झालेल्या रुळांवरून जेव्हा हाय-स्पीड ट्रेन जाते, तेव्हा तिचा समतोल बिघडून गाडी रुळावरून खाली घसरू शकते. रुळांमधील बिघाड वेळेत लक्षात न आल्यास भीषण अपघात होऊ शकतो, ज्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते.







