दिल्लीत येण्यासाठी विषय पाहिजे असं काही नाही, मी येत असतो. काही ठिकाणी स्थानिक निवडणुका आहेत, त्याचा आढावा घ्यायचा आहे. तसेच, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून जी सुनावणी होत आहे, त्यामध्ये शिवसेनेमार्फत (Shivsena) आपली बाजू मांडली जात असून त्याचा आढावा घ्यायचाय, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यासंदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर दिली. यावेळी, पुण्यात मनसेकडून अमित ठाकरेंच्या नेतृत्वात महाविद्यालयातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटविल्याच्या घटनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही एकनाथ शिंदेंनी भूमिका मांडली.
पुण्यातील एका पॉलिटेक्निक महाविद्यालयात अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. त्यानंतर, याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपच्यावतीने आज मनसेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता.
प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचा फोटो लावला
एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना दैवतासमान आदर दिलाय, त्यांनी नौदलाच्या ध्वजावर देखील शिवाजी महाराजांना स्थान दिलंय. सरकार स्थापन करतानाही त्यांनी शिवाजी महाराजांमुळे स्थापन झालंय असं म्हटलं. शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण एक प्रोटोकॉल असतो, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी पुण्यातील घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. तसेच, प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो कार्यालयात लावला जातो, असेही शिंदेंनी सांगितले. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयातील कार्यालयातून शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवायला सांगितला होता. त्यानंतर, मनसैनिकांनी तो फोटो हटवल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आता, एकनाथ शिंदेंनी या वादावर भाष्य केलंय.
आधी बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करतात
धनुष्यबाण बाळासाहेबांना प्राणाहून प्रिय होता, त्यांनी हिंदुत्व गोठवलं, बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवायची मागणी करतायत, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण गोठवण्याची जी मागणी करण्यात आली. त्यावरुन, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पन्हा एकदा टीकेचे बाण चालवले. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, जनतेनेदेखील आम्हाला भरभरून विश्वास दिलेला आहे. शेवटी घटना आहे, पक्षाची घटना आहे, लोकशाही आहे, त्यामुळे शिवसेनेच्या वतीने सुनावणी सुरू झाली की उत्तरं मिळतील, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
जरांगे पाटलांनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी
मनोज जरांगे यांबदद्ल मी माझी भूमिका परभणीत मांडली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी खऱ्या अर्थाने, ज्या काही अडचणी आहेत, त्या मी जवळून पाहिल्या आहेत. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा निर्णय घेतला गेला. मराठा तरूणांना नोकऱ्या दिल्या,
कुणबी प्रमाणपत्र जे कायद्याने देय आहे, तीही दिली जात नव्हती. त्यासाठी, मी शिंदे समिती गठीत केली, त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला. इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. मनोज जरांगेंनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे म्हणत अंतरवालीतील उपोषणावरूनही एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली.







