विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत (Virar News) नालासोपारा पश्चिमेतील 14 ते 17 वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली. यापैकी दोघांना पोलिस आणि होमगार्ड जवानांनी धाडसाने वाचवले, तर अन्य दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
आज सकाळी सुमारे 9.45 वाजता ही चारही मुले समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करत असताना किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदार, पुरुष होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांनी त्यांना समुद्रात उतरू नये, अशी सूचना देत हटकले. त्यानंतर गस्त पथक पुढे निघून गेले. मात्र, पथक निघून गेल्यानंतर ही मुले पुन्हा समुद्रात उतरली. काही वेळातच मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केल्याने पोलीस आणि होमगार्ड जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्यात उड्या मारल्या. त्यांनी दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, उर्वरित दोघांना समुद्राच्या जोरदार लाटांनी आत खेचल्याने ते बेपत्ता झाले.
अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्राच्या पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून बंदी आदेश लागू- (Virar Arnala Beach News)
विशेष म्हणजे, अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्राच्या पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतचे इशारे देणारे फलकही अर्नाळा सागरी पोलिसांनी समुद्रकिनारी लावले आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सध्या जीवरक्षक, सर्च क्लब, अग्निशमन दल आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता दोन्ही मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.








