मुंबईत मन हेलावणारी घटना घडली आहे. स्कूल बसमधून शाळेत जाणाऱ्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. चेंबूरच्या 11 नंबरच्या रोडवर एक झाड या बसवर कोसळलं. या दुर्घटनेत 10 विद्यार्थी जखमी झाले. एका विद्यार्थ्याचा या घटनेत मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे मुंबईत आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे. खूप प्रतिक्षेनंतर पाऊस येत आहे. पण पाऊस सुरु होताच या दुर्दैवी घटनेने मुंबईकरांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी आपला मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवलं, आपल्या या मुलांच्या उज्ज्वल भविष्याबाबत स्वप्न पाहिली आज त्याच मुलांचा असा अपघात होणं हे अनपेक्षित आहे. या मुलांच्या आई-वडिलांना आज सावरणं कठीण आहे. ज्या विद्यार्थ्याने या दुर्घटनेत जीव गमावला आहे, त्याच्या आई-वडिलांची झालेली हानी कधीही भरुन काढता येणार नाही. या दुखद घटनेमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भावूक करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
रितू तावडे यांची भावनिक प्रतिक्रिया
“अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला खूप वाईट वाटत आहे. महापौर नाही तर एक आई या नात्याने सुद्धा मला वाईट वाटत आहे. एक बाळ तिथे अडकून पडलेलं आहे. त्याला रेस्क्यू करण्याचे काम चालू आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी निघतेय”, अशी भावनिक प्रतिक्रिया रितू तावडे यांनी घटनेनंतर दिली.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या चेंबूर येथे 11 नंबर रोडवर मोठी दुर्घटना घडली आहे. एका शाळेच्या बसवर झाड उन्मळून पडलं आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 10 विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच एक विद्यार्थी हा बसमध्ये अडकला आहे. त्याला बसमधून बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या
घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महापौर नाही तर आई म्हणून खूप वाईट वाटत आहे. एक बाळ अडकून पडलं आहे. मी घटनास्थळी जात आहे, असं रितू तावडे यांनी सांगितलं. यानंतर रितू तावडे या घटनास्थळी दाखल झाल्या.
रितू तावडे आणखी काय म्हणाल्या?
“अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. युनिव्हर्सल स्कूलची ही बस होती. ही बस मुलांना शाळेत घेऊन जात होती. पण चेंबूरच्या 11 नंबरच्या रस्त्यावर बसवर झाड कोसळलं आहे. बसमध्ये जवळपास 13 विद्यार्थी होते. त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आहे. 1 विद्यार्थी अडकून पडलेला आहे. बाकीचे विद्यार्थी देखील जखमी झालेले आहेत. एकाचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मी स्वत: घटनास्थळाच्या दिशेला निघाली आहे”, असं रितू तावडे यानी सांगितलं.
“पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली की, त्या भागातील झाडांची ट्रिमिंग झाली होती का? तर त्या रस्त्यावर झाडांचे ट्रिमिंग झाले होते. पण ही बस जात असताना झाड कोसळणं ही खूप दुर्दैवी घटना आहे”, असं रितू तावडे म्हणाल्या.
‘झाडांचे ट्रिमिंग झाले होते’
“मी पावसाळ्याआधी शंभर टक्के आढावा घेतला होता. मी स्वत: रिव्ह्यू मीटिंग घेतल्या होत्या. मुंबईतील जेवढी झाडे आहेत त्याचे सर्वेक्षण करा, किती वर्षांपासूनची झाडे आहेत, आता त्यांची काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. मी माझ्या स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. ट्रिमिंग पूर्ण झाले होते. तरीही झाड कोसळल्याची घटना घडली आहे. मी आता घटनास्थळी जावून माहिती घेते”, अशी प्रतिक्रिया रितू तावडे यांनी दिली.
रितू तावडेंचा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित झाड उन्मळून पडू शकतं. त्यामुळे याबाबात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती स्थानिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली होती, अशी तक्रार स्थानिकांनी रितू तावडे यांच्याकडे केली आहे. स्थानिकांच्या या तक्रारी खऱ्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.








