हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फुटीर भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. कारण आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे उबाठाकडून रिंगणात उतरले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासाच ठाकरे गटाने आष्टीकरांच्या सुपुत्राबद्दल कठोर निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियातून यासंबंधी घोषणा केली आहे.
केवळ ८४ मतं
कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकी कृष्णा पाटील आष्टीकर यांचा दारुण पराभव झाला. त्यांना केवळ 84 मते मिळाली, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू असलेले भाजप उमेदवार अमर राजुरकर यांनी 339 मते मिळवत विजयाची हॅट्रिक साधली.
ऑपरेशन टायगरमुळे संभ्रम
नागेश पाटील आष्टीकर यांना मुलाचा पराभव हा मोठा धक्का मानला जात असला, तरीही कृष्णा पाटील पित्याप्रमाणे गेम करुन दगाबाजी करणार, अशी अटकळ ठाकरे गटातून आधीच बांधली जात होती. काँग्रेसकडे 92 संख्याबळ असताना 19 संख्याबळ असलेल्या ठाकरे गटाला नांदेडची जागा सुटली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली असताना मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या धडकल्या, त्यामुळे काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नगरसेवकही संभ्रमात पडले होते.
अंधारेंचा कयास खरा
आपला विजय निश्चित असल्याचा दावा कृष्णा पाटील आष्टीकर करत होते. परंतु ‘कृष्णा पाटील आष्टीकर हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणं ही निव्वळ दिशाभूल आहे. भाबडेपणा सोडा, हा सुद्धा बापाइतका चतुर आणि धूर्त आहे’ अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरुन कृष्णा आष्टीकरांनी पलटवार केला असता, “चला कृष्णराव, मी माझे शब्द मागे घेते, कधी करताय नागेश पाटील आष्टीकर यांना जोडे मारो आंदोलन?” असा विचारत अंधारेंनी पुन्हा त्यांना डिवचलं होतं. आता त्यांच्या पराभवानंतर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.








