मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज हजारो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात आणि आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचतात. ट्रेनचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा सुद्धा असतो, मात्र अशातही काहीजण रेल्वेने विनातिकीट प्रवास करतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आणि त्यांना ऍड घडवण्यासाठी रेल्वे विनातिकीट प्रवासाच्या दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेणार आहेत. जनविश्वास (दुरुस्ती) कायदा 2026 अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या बदलांनुसार विनातिकीट रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण भाड्यासह किमान 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. सध्या असलेले 250 रुपयांचा दंड दुप्पट होणार असून, रेल्वे मंडळाच्या स्वतंत्र अधिसूचनेनंतर त्याबाबत अंमलबजावणी होणार आहे.
विनातिकीट प्रवासासाठी आकारण्यात येणारा किमान दंड 2004 मध्ये 50 रुपयांवरून 250 रुपये केला होता. त्यानंतर गेल्या 22 वर्षांत भारतीय रेल्वेचे झालेले आधुनिकीकरण, वाढती महागाई, दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित प्रवाशांविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असून, काही गंभीर प्रकरणांमध्ये कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजित दंडवाढ किती?
विनातिकीट प्रवास, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास फेरी मारणे अथवा भीक मागणे महिला आरक्षित डब्यात प्रवेश अनधिकृत प्रवेश धोकादायक वस्तूंसह प्रवास बदललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रवासी सुविधांवरील वाढता खर्च लक्षात घेता विनातिकीट प्रवास दंडाची रक्कम ही 250 रुपयांवरून 500 रुपये करण्याची शक्यता आहे.
अनेक रेल्वे विभागांकडून दंड वाढविण्याबाबत पत्रव्यवहार रेल्वे बोर्डाकडे करण्यात आला होता. अखेर रेल्वे कायदा, 1989 मध्ये करण्यात आलेल्या दंडवाढी सुधारणांना राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असून, 8 एप्रिल 2026 रोजी त्यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे विभागांना सुधारित तरतुदींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई उपनगरी रेल्वेत रोज शेकडो लोक विनातिकीट प्रवास करताना सापडतात. त्यांना आता आळा बसण्याची शक्यता आहे.








