गुजरात टायटन्सच्या संपूर्ण संघ आयपीएल 2026 च्या फायनलनंतर थोडक्यात बचावला आहे. मैदानात अंतिम सामना गमावल्यानंतर मैदानाबाहेर झालेल्या एका विचित्र अपघातामधून संघ अगदी थोडक्यात वाचला. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन गुजरातचा संघ हॉटेलमध्ये जात असतानाच संघाच्या बसमध्ये शॉट सर्किट झालं. यामुळे बसच्या पुढील भागातून धूर येऊ लागला आणि बस जागेवरच बंद पडली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. बसने प्रवास करणाऱ्या खेळाडूंबरोबरच सर्वच सपोर्टिंग स्टाफला वेळीच बाहेर काढण्यात आलं आणि कोणालाही काही इजा झाली नाही.
नेमकं घडलं काय?
गुजरात टायटन्सचे सर्व खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ सुरक्षित आहेत. टीमच्या बसमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला छोटीशी आग लागल्याने गाडीच्या पुढील भागातून धूर येऊ लागल्यानंतर सर्वांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी पुन्हा चालूच झाली नाही. सर्व खेळाडूंना काही काळ रस्त्याच्या कडेला वाट पहावी लागली. त्यानंतर पर्यायी बसने संघाला हॉटेलमध्ये सोड़ण्यात आलं. आधीच मैदानात मिळालेल्या पराभवामुळे गुजरातच्या संघातील खेळाडू निराश असतानाच हा अपघात झाल्याने काही खेळाडूंना धक्का बसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुनच दिसत होतं.
अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यजमान गुजरातच्या संघाला 5 विकेट्स आणि दोन ओव्हर राखून पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवातच अडखळत झाली. त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 बाद 155 धावाच करता आल्या. गुजरातचा संघ अंतिम सामन्यामध्ये खेळण्याच्या दाबावाखाली होता असं त्यांची फलंदाजी पाहून व्हाटत होतं. याच दबावाखाली फलंदाजीचा डोलारा कोसळला. वॉशिंग्टन सुंदर वगळता कोणत्याही खेळाडूला फलंदाजीमध्ये छाप पाडता आली नाही.
विराटने संघाला जिंकून दिलं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचीही 156 धावांचा पाठलाग करताना सुरुवात फारच वाईट झाली. मात्र विराट कोहलीने मैदानावर तंबू टाकला आणि अगदी शेवटपर्यंत नाबाद राहून त्याने विजयी षटकारासहीत सामना जिंकून दिला. विराटने 42 बॉलमध्ये नाबाद 75 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. यासाठी विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजरातला त्यांच्याच होम ग्राऊंडवर दुसऱ्यांदा अशाप्रकारे अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आरसीबीचा हा सलग दुसऱ्या वर्षातील दुसरा विजय ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघानंतर अशाप्रकारे सलग दोन वर्ष चषक जिंकणारी आरसीबी ही तिसरी टीम ठरली आहे.








