Search
Close this search box.

रस्ता अपूर्ण तरीही मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरू कशी? खारपाडा Toll नाक्यावरून वाद पेटला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

(Mumbai Goa Highway Toll) मे महिन्याची सुट्टी सुरुय त्यामुळं कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. किंबहुना दळणवळणाच्या अनेक सोयींच्या उपलब्धतेमुळं सध्या कोकणात जाण्यासाठी मोठ्या सुट्ट्यांची वाट पाहिलीच जात नाही. मात्र, याच कोकणात जाण्यासाठीचा प्रवास आता काहीसा वाद्याच्या भोवऱ्यात येत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही आकारला जाणारा टोल.

यापुढे तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. तब्बल 14 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या टप्प्यासाठी टोलवसुलीला सुरुवात झाली आहे. पळस्पे ते कासू या मार्गावरील खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्यात आला असून, वाहनधारकांकडून टोल आकारणी सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालं नसताना सुरू करण्यात आलेल्या या टोलवसुलीविरोधात कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कासवगतीनं. काही भाग विविध कारणांमुळे रखडले आहेत. काही भागात पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत अचानक टोलनाका सुरू करून वाहनधारकांकडून शुल्क आकारलं जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, वाहनचालक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे. “महामार्ग पूर्ण झालेला नाही, अनेक ठिकाणी खड्डे आहेत, सेवा रस्ते तयार नाहीत, वाहतूक कोंडीचा त्रास आणि मनस्ताप कायम आहे. मग नागरिकांनी टोल कशासाठी भरायचा?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच स्थानिक वाहनांना टोलमुक्ती द्यावी, अशी प्रमुख मागणी आता जोर धरू लागली आहे.

खारपाडा परिसरातील ग्रामस्थ, व्यावसायिक तसंच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना टोलचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने संतापाचं वातावरण आहे. कोकणातील अनेक भागांतून या निर्णयाविरोधात आवाज उठू लागला असून, पुढील काळात आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.

कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम शंभर टक्के पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं खरं मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पुलांची कामे, उड्डाणपूल, सेवा रस्ते आणि डांबरीकरणाची कामं अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय. माणगाव आणि इंदापूर इथल्या बायपासचं काम लवकर पूर्ण होईल असं अद्याप दिसत नाही. ज्यामुळं महामार्ग प्राधिकरणाच्या या धोरणाविरोधात कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुलीसंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. तेव्हाच प्राधिकरणाकडून टोल वसुली केली जाण्याची चाहूल लागली होती. मात्र जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोवर टोल वसुली होऊ देणार नाही अशी भूमिका रायगड जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी घेतली. आता मात्र टोलवसुली सुरू झाल्यावर हे लोकप्रतिनिधी कुठे गेले असा सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “महामार्गाचे काम पूर्ण न करता टोलवसुली करणे म्हणजे नागरिकांवर अन्याय आहे. स्थानिक वाहनांना तातडीने टोलमुक्ती द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

admin
Author: admin

और पढ़ें