दहशतवादाला निधी पुरवणे, भारतीय सैन्य आणि कश्मीरी पंडीत विरोधात हिंसाचार करणे यांसह अनेक आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या काश्मिरी फुटीरतावादी नेते यासीन मलिक याच्यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने यासिन मलिक (Yasin Malik) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णया विरोधात एनआयए ने दिल्ली हायकोर्टात अपिल करून यासिन मलिक याला मृत्युदंड शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एनआयए ने ‘अतिशय दुर्मिळ’ प्रकरणात मलिक याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, तर मलिक सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
एनआयएचं काय म्हणणं आहे?
2017 च्या दहशतवादी निधीपुरवठा प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली परंतु ही शिक्षा मृत्युदंडात बदलण्याची मागणी करणारी याचिका एनआयएने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
यासिन मलिकची गुन्हेगारी पार्श्वभूमी :
यासीन मलिकवर काश्मीरमध्ये दगडफेक करणे
दहशतवादी संघटनांसाठी निधी उभारणे
भारतीय सैनिक व काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार केल्याचा आरोप आहे.
यासिन मलिक भारतीय दंड संहितेच्या कलम 120B (गुन्हेगारी कट), 121A (भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट) तसेच UAPA (बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
25 मे 2022 रोजी, पटियाला हाऊस न्यायालयाने यासीन मलिकला यूएपीए आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्यानंतर एनआयए ने पटियाला हाऊस कोर्टाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात अपील केले. याबाबत हायकोर्टाने एनआयए ला उत्तर सादर करण्यास सांगितले. यापूर्वी यासिन मलिक याला कोर्टात प्रत्यक्ष हजर करण्याबाबत मागणी करण्यात आली होती परंतु सुरक्षेचे कारण देत तपास यंत्रणांनी यासिन मलिक याला कोर्टात आणण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी 22 एप्रिल पर्यंत पुढे ढकलली होती. तो पर्यंत एनआयएला उत्तर दाखल करण्याची अंतिम संधी दिली आहे.








