Search
Close this search box.

कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्ह्यातील कल्याण–मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) 11 जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात इको टॅक्सी चालक व सिमेंट मिक्सर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि वेगमर्यादा न पाळणे ही गंभीर समस्या असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शोक व्यक्त केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच रोडवर (Kalyan) अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, 5+1 आसन क्षमता असलेल्या इको वाहनात आजही चक्क 10 ते 11 प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे, कालच्या अपघातातून ना प्रवाशांनी, वाहनधारकांनी, ना प्रशासनाने कुठला धडा घेतलाय, असेच म्हणावे लागेल.

कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर काल झालेल्या भीषण अपघातात इको टॅक्सी व सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड, भिवंडी व पडघा भागात आजही काळी-पिवळी इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

इको टॅक्सीमध्ये नियमाप्रमाणे 5 प्रवासी  चालक असे एकूण 6 जण अपेक्षित असताना प्रत्यक्षात 10 प्रवासी व 1 चालक असा प्रवास सुरू आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. दरम्यान, टॅक्सी चालकांनीही प्रशासनावरच जबाबदारी ढकलली आहे. टॅक्सीचालकांकडून “अधिक प्रवासी घेतल्यास कारवाई का होत नाही? वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कुठे आहे?” असा सवाल चालकांनीच उपस्थित केला. वाढती महागाई, सीएनजी दरवाढ व देखभाल खर्च यामुळे कमी प्रवाशांमध्ये व्यवसाय परवडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, लोकांचे जीव असेच जाणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

परिवहनमंत्र्यांचे नागरिकांनाच आवाहन

कल्याणमध्ये अपघात झालेल्या संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

admin
Author: admin

और पढ़ें