केंद्रीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या पूर्वानुमानानुसार देशातील हवामानस्थितीत सातत्यानं आणि तितक्याच वेगानं बदल होत असून या बदलांचा परिणाम उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या राज्यांवर दिसून येत आहे. पुढील 24 तासांमध्ये उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देत हवामान विभागानं 40 ते 50 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारे वाहतील असा इशारा जारी केला आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही हा पाऊस हजेरी लावेल असा स्पष्ट इशारा दिला आहे.
महाराष्ट्रावर अस्मानी संकट… काय आहे या संकटाचं स्वरुप?
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या काही भागांवर पावसाचं सावट असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परिणामी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यात ढगाळ हवामान असेल. तर, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणही या पावसाला अपवाद ठरणार नसून, इथंही ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम बरसात होऊ शकते.
मागील 24 तासांमध्ये राज्याला गारपिटीचा तडाखा…
उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपलं असून मागील 24 तासांत नाशिक जिल्ह्यतील येवला, निफाडमध्ये पावसानं हजेरी लावली. तर जळगावमध्येदेखील अवकाळी पावसाची हजेरी लावली, जिल्ह्यात बहुतांश भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. धुळ्यात पावसासोबत चक्क गारपीट झाली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा या दोन तालुक्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपटीने अक्षरशः झोडपून काढलं. ज्यामध्ये फळबागांचं मोठं नुरसा झालं, तर रब्बी पिकं भुईसपाट झाली.
फक्त उत्तर महाराष्ट्र नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. ज्यामुळं घाट क्षेत्रात धुकं आणि गारठा वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं नागरिकांमध्ये आणि मासेमारांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. हवामानाची ही स्थिती आठवड्याच्या शेवटापर्यंत कायम राहणार असून आता हा कमी दाबाचा पट्टा कधी निवळतो त्यावरच पुढील बदल अवलंबून आहेत हे स्पष्ट आहे.
देशभरातील हवामान बदलास नेमकं कारण काय?
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह पश्चिमोत्तर भारतावर ढगाळ वातावरणाचं सावट असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा असून, हिमालयाच्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता आहे. 30 जानेवारी रोजी उत्तर पश्चिम भारतामध्ये आणखी एक नवा पश्चिमी झंझावात सक्रिय होत असल्यामुळं उत्तर भारतात पाऊस काही इतक्यात पाठ सोडत नाही असंच चित्र आहे.
नागरिकांनी काय आणि कशी काळजी घ्यावी?
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवर्षाव सुरू असल्या कारणानं अनेक वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले आहेकत. ज्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश जारी केले आहेत. परिणामी पर्यटनाचा हा माहोल पाहता, परराज्यांमध्ये भटकंतीसाठी निघणाऱ्यांनी हवामान विभागाच्या पूर्वानुमानाचा अंदाज घेत प्रवासाची आखणी करणं उत्तम ठरेल.
काश्मीरमध्ये हिमस्खलन…
मध्य काश्मीरमधील सोनमर्ग भागात मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाल्याची माहिती समोर आली असून, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, धोका टळलेला नसल्यानं अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि अतीधोकादायक क्षेत्रांसह हिमस्खलन-प्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्यासाठी सर्वांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत.








