राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे ‘दादा’ व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार 66 वर्षांचे होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला एका खासगी विमानाने प्रवास करत होते. हे विमान VT-SSK नोंदणी क्रमांक असलेले बॉम्बार्डियर लिअरजेट 45 मॉडेलचे होते. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणिकॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले. प्रशासनावर पकड असलेला धुरंदर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधकडपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत.
विमान धावपट्टीवरून घसरुन अपघात
अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. त्यांच्या आज चार ते पाच सभा होणार होत्या. ते सकाळी 8:10 वाजता मुंबईहून निघाले. महाराष्ट्र विमान वाहतूक विभागाच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने पायलटने विमान अधिक उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला आणि त्यात आग लागली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाने लँडिंग दरम्यान कोणताही आपत्कालीन सिग्नल दिला नाही. त्याने ‘मेडे’ कॉलही केला नाही.
तीन दिवसांचा दुखवटा, उद्या अंत्यसंस्कार
सकाळी पावणे नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवसांचा राज्य दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (29 जानेवारी) विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून सांत्वन केले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह देशातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. राज्यभरातूनर कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये पोहोचणार आहेत.
शरद पवारांसह पवार कुटुंबीय बारामतीत पोहोचले
अपघाताचे वृत्त समजताच पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मानसिक धक्का बसला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या. त्यांचे विमानाने बारामतीमध्ये आगमन झालं. दुसरीकडे काका शरद पवार मुंबईमध्ये होते. वैद्यकीय तपासणी करून आल्यानंतर कुटुंबीयांनी अजित पवार यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यानंतर एक एक करून हे सर्व पवार कुटुंबीय बारामती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोहोचले. बारामतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलं होतं. याठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी लाखोंचा जमाव पोहोचला. दुपारी तीनच्या सुमारास अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले, शरीराचे अवयव ब्लँकेटने झाकले
प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, विमानाचा स्फोट इतका जोरदार होता की कोणीही काहीही करू शकले नाही. बचाव पथक आले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुद्धा आम्हाला पाणी आणण्यास सांगितले. आम्ही बादल्यांमध्ये पाणी आणले. अजित पवार यांचे शरीर एका बाजूला पडले होते. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आम्ही एक नवीन ब्लँकेट दिले आणि त्यांचे शरीर त्यात गुंडाळले. सुमारे अर्धा तास आग सुरु होती. चष्मा आणि घड्याळावरून आम्हाला ते अजित दादा असल्याचे ओळखता आले.
महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री
22 जुलै 1959 रोजी आशा आणि अनंतराव पवार यांच्या पोटी जन्मलेले अजित पवार 1982 मध्ये राजकारणात आले, त्यांचे काका (त्यांच्या वडिलांचे धाकटे भाऊ) शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून, जेव्हा ते साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले अजित पवार कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत. जुलै 2023 मध्ये भाजप आणि शिवसेना युती सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, परंतु त्यांचे सरकार केवळ दोन दिवस टिकले. अजित पवार हे सध्याच्या सरकारमध्ये अर्थ आणि नियोजन मंत्री होते. पुढील महिन्यात 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना ते 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार होते.
साडे चार दशकांपासून राजकारणात
अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र, त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. अजित पवार यांनी 1995 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
शरद पवारांच्या वाढदिनी एकत्र
पवार कुटुंबीयांचे वलय महाराष्ट्रासाठी नवीन नाही. गेल्या सहा दशकांपासून पवार कुटंबीयांचं गारुढ समाज आणि राजकारणावर राहिलं आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्याची दोन शकले झाली. त्यामुळे कुटुंबातही विसंवाद झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालं गेलं विसरून गेलं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वादाची दरी कमी झाली होती. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिनी अजित पवार एकत्र जमले होते. त्यानंतर बारामतीमध्ये झालेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमातही हे काका पुतण्या एकत्र आले होते. महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली होती. मात्र, काळाने घातलेल्या झडपेत या सर्व आठवणी आता भुतकाळात गेल्या आहेत.
विमान कंपनी काय म्हणाली?
VSR व्हेंचर्स म्हणजेच ज्या कंपनीच्या अजित पवार विमानातून उड्डाण करत होते, त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे. पायलट धावपट्टी पाहू शकला नाही. त्याला अंदाजे 16 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. सह-वैमानिकाला अंदाजे 1500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. विमानात कोणताही तांत्रिक दोष नव्हता. एअरलाइनकडे अजूनही सात विमाने आहेत. आम्ही ती ग्राउंड करत नाही आहोत. DGCA आमच्या विमानाची चौकशी करत असल्याचे म्हटलं आहे.
AAIB टीम बारामतीला रवाना झाली
क्रॅस अपघात तपास ब्युरोची एक टीम अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी दिल्लीहून बारामतीला रवाना झाली आहे. विमानाची माहिती गोळा करण्यासाठी ब्युरोची एक टीम दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स कार्यालयात पोहोचली आहे. कंपनीचे मालकही कार्यालयात उपस्थित आहेत.
2023 मध्येही व्हीएसआर व्हेंचर्सचे विमान कोसळले
दुसरीकडे, 14 सप्टेंबर 2023 रोजी, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना व्हीएसआर व्हेंचर्सचे लिअरजेट 45 जेट विमान कोसळले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करा
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौकशीची मागणी केली आहे. ममता म्हणाल्या, कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी झाली पाहिजे. हे विनाकारण भीती पसरवणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे.
ममता नेमकं काय म्हणाल्या?
जर एखाद्या वरिष्ठ राजकीय नेत्यासोबत अशी घटना घडू शकते, तर ती आपल्या व्यवस्थेच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. मी असे अहवाल पाहिले की ते एनडीएमध्ये असताना त्यांच्या राजकीय स्थानाचा विचार करत होते. अशा परिस्थितीत, या घटना खूप चिंताजनक आहेत. मला इतर एजन्सींवर विश्वास नाही. त्या पूर्णपणे तडजोड केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास झाला पाहिजे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची चौकशी होणार असल्याचे म्हटलं असलं, तरी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलेला नाही.
विमान वाहतूक मंत्री काय म्हणाले?
उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाले तेव्हा बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती. नायडू आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून पुण्यात आले आहेत. ते म्हणाले की, जेव्हा एटीसी बारामतीने पायलटला धावपट्टी दिसत आहे का असे विचारले तेव्हा उत्तर नाही असे आले, त्यानंतर विमानाने फेरी मारली. ते म्हणाले की दुसऱ्या लँडिंग प्रयत्नादरम्यान, एटीसीने पुन्हा विचारले की धावपट्टी दिसत आहे का, ज्यावर पायलटने उत्तर दिले, हो, ते दिसत होते. एटीसीकडून लँडिंग परवानगी मिळाल्यानंतर विमान कोसळले असे नायडू म्हणाले. आम्ही अधिक माहिती शोधत आहोत आणि चौकशी करू, असे ते म्हणाले.








