मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray) यांनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय. मात्र तब्बल 25 वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबईत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई आणि मराठीच्या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले होते. जुलै 2025 मध्ये पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. त्यानंतर रक्षाबंधन, दिवाळी या सणाव्यतिरिक्त ठाकरे कुटुंबीय एकत्र पाहायला मिळाले. महापालिकांच्या निवडणुकीदरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित मुंबईतील शिवाजी पार्कवर सभाही घेतली. मात्र आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार- (Raj Thackeray-Uddhav Thackeray)
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे षण्मुखानंद सभागृहात एकत्र येणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू 23 जानेवारीला या कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत असताना षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
मराठीबहुल भागांमधील मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी- (Shivsena UBT-MNS Yuti Mumbai)
राज-उद्धव ठाकरे यांच्या शाखांना दिलेल्या भेटी आणि मुंबईच्या शिवाजी पार्कमधील सभेचा मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे दादर, वरळी, लालबाग, परळ, विक्रोळी, भांडूप या मराठीबहुल भागांमधील मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी एकजुटीने उभा राहिला होता. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी अनेक नगरसेवकांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाकडे फक्त 36 माजी नगरसेवक उरले होते. अनेक बडे नगरसेवक साथ सोडून गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही लढाई खूपच अवघड मानली जात होती. मात्र, ठाकरेंनी ज्याठिकाणी नगरसेवक साथ सोडून गेले आहेत, तिकडे नवी फळी उभारून 65 जागा निवडून आणल्या. यामध्ये मनसेच्या सहा जागांची भर पडल्यास हा आकडा 71 इतका होता. 2017 मधील 84 जागांच्या तुलनेत हा आकडा अगदीच कमी नाही. ठाकरे बंधूंनी आणखी लवकर युतीची घोषणा केली असती आणि मुंबईत आणखी सभा घेतल्या असत्या तर या जागा वाढू शकल्या असत्या, असाही जाणकारांचा अंदाज आहे.









