गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ‘बर्च बाय रोमियो लेन्स’ (Birch by Romeo Lane) नाईटक्लबच्या चार सह-मालकांपैकी एक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. भीषण आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फरार असलेल्या गुप्ताविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी झाल्यानंतर त्याला दिल्लीत ताब्यात घेण्यात आलं आहे.
उत्तर गोव्यातील नाईट क्लबमध्ये शनिवारी लागलेल्या भीषण आगीत होरपळून 25 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये पाच पर्यटकांचा समावेश आहे. अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स’ (Birch by Romeo Lane) या पबमध्ये शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला.
“आम्ही नाईटक्लबच्या मालकांपैकी एक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो सहावा व्यक्ती आहे,” अशी माहिती पीटीआयने गोवा पोलिसांच्या प्रवक्त्याचा हवाल्याने दिली आहे.
“दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी पोलीस पथकाला त्याची शोध घेण्यात अपयश आल्यानंतर त्याच्याविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं,” असं प्रवक्त्याने सांगितले. गुप्ता यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना औपचारिकपणे अटक केली जाईल, असंही त्यांनी सांगितले.
7 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीनंतर आतापर्यंत पोलिसांनी नाईटक्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया, गेट व्यवस्थापक रियांशु ठाकूर आणि कर्मचारी भरत कोहली यांना अटक केली आहे. आणखी एक सह-मालक सुरिंदर कुमार खोसला यांच्याविरुद्ध लूक-आउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे, तर आणखी दोन मालक सौरभ आणि गौरव लुथरा थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले आहेत. दोन्ही भावांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
25 पैकी 23 जणांचा गुदमरल्याने मृत्यू
पणजीपासून 25 किलोमीटर अंतरावरील हडफडे-बागा भागातील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मध्ये शनिवारी भीषण आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 25 पैकी 23 जणांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. तर दोघे आगीत होरपळले. सहा जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. या आगीने काही क्षणांत रौद्ररुप धारण करून संपूर्ण परिसराला घेरले.
मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघे
अन्य 20 जण क्लबमधील कर्मचारी असून यात उत्तराखंड (5), नेपाळ (4), झारखंड (4), आसाम (4), महाराष्ट्र (2), उत्तर प्रदेश (1), प. बंगालचे (1) रहिवासी आहेत. या सर्वाची ओळख पटली आहे.









