भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्यानं कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असून आता एक नवं संकट देशाच्या सागरी हद्दीत घोंगावत असल्याचं म्हटलं जात आहे. IMD च्या प्राथमिक निरीक्षणानुसार दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक एक नवी चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.
कमी दाब आणि चक्राकार वाऱ्यांची ही स्थिती पाहता, हे वारे लवकरच ‘दितवाह’ (Ditwah) चक्रीवादळात रुपांतरित होणार असून त्यामुळं तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतातील बहुतांश भागांमध्ये सोसाट्याच्या विध्वंसक वाऱ्यांचा इशारा जारी करण्यात आला आहे.
प्राथमिक निरीक्षणानुसार हे कमी दाबाचं क्षेत्र 17 किमी प्रतितास इतक्या वेगानं उत्तर उत्तर पश्चिमेस पुढे जाणार असून 30 नोव्हेंबर 2025 ला सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरीसह दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. ज्यामुळं 27, 28 आणि 29 नोव्हेंबरदरम्यान चेन्नई, नागपट्टिनम्, तिरुवल्लूर, तंजावूर इथं आयएमडीनं अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरही ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा असून समुद्र खवळलेला राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दितवाह चक्रीवादळामुळं विनाशकारी स्थिती उद्भवू शकते…
हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्याचा इशारा यंत्रणांनी दिला असून संकटसमयी नुकसान कमी होणं या यामागचा हेतू आहे. सध्याच्या घडीला सेन्यार चक्रीवादळ कमकुवत झालं असलं तरीही दितवाहची प्रणाली बंगालच्या उपसागरात निर्माण होत असल्यामुळं आयएमडी या वाऱ्यांवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा पुढील 48 तासांमध्ये हे वारे नेमके किती तीव्र होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणात असून संकटाची तीव्रता निर्धारित करणार आहेत.








