रविवारी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. 16 नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं तुम्हीदेखील रविवारी प्रवासाचे नियोजन करत असाल तर याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करा. कसं आहे रेल्वेच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान, हार्बर मार्गवरील वाशी ते पनवेलदरम्यान, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे: बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर, तर राम मंदिर ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप जलद मार्गावरील लोकल सेवा बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते गोरेगावदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून चालवली जाईल. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही सेवा अंधेरी, बोरिवली लोकल हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत चालविण्यात येणार आहेत
मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर
कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3. 55वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. ब्लॉककाळात लोकल करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकात थांबणार नाहीत.
हार्बर मार्ग
कुठे : वाशी ते पनवेल यादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर
कुठे : सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. यासह ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक वेळेत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध असेल.








