अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. अल्पशा आजाराने सकाळी सहा वाजता निधन झाले आहे. शिवाजीराव कर्डीले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तीनदा आमदार म्हणून निवडून आले
कर्डीले हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी नुकती झालेली विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर जिंकली होती. शिवाजीराव कर्डीले यांनी डेअरी व्यवसायातून राजकारणात प्रवेश केला. ते 2009, 2014 आणि आता 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
डेअरी क्षेत्रातून आले पुढे
शिवाजीराव कर्डीले यांचे बालपण अहिल्यानगर जिल्ह्यात गेले. त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शिक्षणापासून दुरावले. त्यांनी डेअरी व्यवसाय सुरू केला, ज्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर ओळख मिळाली. शिवाजीराव कर्डीले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. ते राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामीण विकास, शेती आणि डेअरी क्षेत्रातील मुद्द्यांवर काम करायचे.
52.54 टक्के मतं पडली
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आणि सध्या आमदार म्हणून कार्यरत होते. भाजपकडून लढताना ते 1 लाख 34 हजार 889 मतांनी जिंकले होते. त्यांना एकूण मतदानाच्या 52.54 टक्के मतं पडली होती.
अटक अन् सुटका…
2018 मध्ये शिवाजीराव कर्डीले यांना अहमदनगर पोलिसांनी शिवसेना नेते संजय कोटकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केली होती. याशिवाय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांनी राजकारणात पुनरागमन केले.
जिल्ह्याचे मोठे नुकसान; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना!” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली,” असं रोहित यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
