मुंबईत मेट्रोची कामे झपाट्याने सुरू आहेत. मुंबई शहरांना उपनगराशी जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मुंबई मेट्रो लाइन 2B म्हणजे यलो लाइन मुंबईतील पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाइन 2A आणि 2B हे दोन टप्पे आहेत. मेट्रो 2Bचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तर, दुसरा टप्पा 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
मेट्रो मार्गिका 2 A दहिसर ते डी.एन नगर अंधेरी पश्चिमपर्यंत सध्या कार्यरत आहे. तर, मार्गिका 2B याच मेट्रो मार्गिकेचा पुढचा टप्पा आहे. मेट्रो 2 B डि.एन नगर ते मंडाले मानखुर्द पर्यंत असणार आहे. या मेट्रो मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. तर पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या चाचण्या लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 5.3 किमी लांबीचा मंडाले ते डायमंड गार्डनर चेंबूरपर्यंत असणार आहे. हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सेवेत येणार आहे.
MMRDA लवकरच डीएन नगर ते खारमधील सारस्वत नगर असा दुसरा टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सारस्वत नगर आणि डायमंड गार्डनमधील फक्त मध्यवर्ती भागच शिल्लक राहील. पूर्ण झाल्यानंतर 20 स्थानकांसह 23.6 किमी लांबीचा लाईन 2बी कॉरिडॉर शहरातील दुसरा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग कनेक्शन प्रदान करेल. सध्या, फक्त मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडते.
किती स्थानके असतील
१. एसिक नगर, २. प्रेम नगर, ३. इंदिरा नगर, ४. नानावटी हॉस्पिटल, ५. खीरा नगर, ६. सारस्वत नगर, ७. नॅशनल कॉलेज, ८. बांद्रा मेट्रो, ९. इनकमटॅक्स ऑफिस, १०. आय एल एफ एस, ११. एम टी एन एल मेट्रो, १२. एस जि बर्वे मार्ग, १३. कुर्ला (पूर्व),१४. इ. इ. एच., १५. चेंबूर, १६. डायमंड गार्डन, १७. शिवाजी चौक, १८. बी एस एन एल मेट्रो, १९. मानखुर्द, २०. मंडाळे मेट्रो.
कशी आहे ही मेट्रो मार्गिका
>> मेट्रो मार्ग-2ब (डि. एन.नगर-मंडाळे) या मार्गाची एकूण लांबी 23.6 कि. मी. एवढी असून यामध्ये एकूण 20 उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
>> सदर मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.
>> सदर मार्ग हा मुंबईतील पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांना जोडणारा आहे.
>> सदर मार्गामुळे मुंबईतील व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिकद्रुष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांस रेल्वे आधारित सुविधा प्रदान होइल.
>> सदर मार्गासाठी मंडाळे येथे 31.4 हेक्टर जागेत मेट्रो कारशेड डेपो बांधण्यात येत असून स्थापत्य कामे प्रगतीपथावर आहेत.सद्यस्थितीत प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत सुमारे 50% ते 75% बचत हि सदर मार्गामुळे होऊ शकते.
