(Maharashtra Marathwada Flood Crisis) मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमध्ये संकटाचं सावट काही केल्या दूर होत नसून, आता इथं ज्याप्रमाणं शेतकऱ्यांच्या मागण्यांचा मुद्दा उचलून धरला जात आहे, त्याचप्रमाणे महिलांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची पूरग्रस्त महिलांची मागणी आहे.
मासिक पाळीमुळं महिलांपुढं कैक संकटं…
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरीपॅडची आवश्यकता असून, लवकरात लवकर ही मदत पुरवण्यात यावी अशी मागणी पूरग्रस्त भागातील महिलांनी केली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे धाराशिव, सोलापूर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली. या पुराने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेकांची घरं, सामान आणि आशेचा आधार पाण्याच्या लाटांमध्ये वाहून गेल्याने नागरिक हताश आहेत.
मागील चार दिवसांपासून पूरग्रस्त नागरिक केवळ एका जोडी कपड्यावर इथं वावरत आहेत. विशेषतः महिलांना आणि किशोरवयीन मुलींना मूलभूत गरजांच्या अभावामुळं कैक गैरसोयींचा सामनाही करावा लागत आहे.
स्वच्छतेचा अभाव अन् आरोग्यविषयक समस्यांनी वाढवली चिंता
मराठवाड्यातील करंजा गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटरी पॅड्ससारख्या अत्यावश्यक वस्तूंची कमतरता त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. पूरग्रस्त भागात सध्या अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी मदत पुरवली जात आहे, परंतु मासिक पाळीच्या वेळी महिलांना सॅनिटरी पॅड आणि स्वच्छतेशी संबंधित अन्य साधनांची तातडीची गरज असल्याची महिलांची माहिती आहे.
करंजा गावातील अनेक महिला आणि किशोरवयीन मुली गेल्या चार दिवसांपासून एकाच जोडी कपड्यांवर दिवस ढकलत आहे. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडची आवश्यकता असल्याचीच मागणी येथील महिला करत आहेत. “आमच्या संसारातील सर्व काही वाहून गेले आहे. आता आम्हाला सॅनिटरी पॅड्स आणि स्वच्छ कपड्यांसारख्या मूलभूत गोष्टींची गरज आहे,” अशी मागणी करंजा गावातील महिलांनी केली आहे, त्यामुळं येथील महिलांपर्यंत आता ही मदत पोहोचवण्याचं आवाहन सर्व स्तरांतून केलं जात आहे.
