बंगळुरुहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळं विमानातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. संबंधित प्रवाशानं योग्य पासकोड टाकला, मात्र कॅप्टननं विमान हायजॅक होण्याच्या भीतीनं दरवाजा उघडला नाही. संबंधित व्यक्ती त्याच्या इतर 8 साथीदारांसह प्रवास करत होता. यासर्व जणांना सीआयएसएफच्या ताब्यात दिलं आहे.
एअर इंडियानं म्हटलं की आम्हाला वाराणसीला जाणाऱ्या विमानासंदर्भातील माहिती मिडिया रिपोर्टसमधून मिळाली आहे. एक प्रवासी टॉयलेट शोधत कॉकपिट प्रवेश क्षेत्रात पोहोचला होता. आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की विमानात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही. लँडिंग वेळी अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
आतापर्यंत प्रवाशानं कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला याची चौकशी सुरु आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची फ्लाईट IX-1086 सकाळी 8 वाजता बंगळुरुहून निघाली होती. विमान वाराणसीत पोहोचल्यानंतर आरोपी प्रवाशांना सीआयएसएफ जवानांच्या ताब्यात देण्यात आलं.
एअर इंडिया एक्स्प्रेस विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच प्रवाशानं कॉकपिटमध्ये जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या केबिन गेट उघडण्याचा प्रयत्न केला. कॉकपिट उघडण्यासाठी पासकोड टाकताच पायलटजवळ त्याचा सिग्नल जातो. जेव्हा पायलटनं सीसीटीव्ही पाहिला तेव्हा अपहरणाच्या भीतीनं त्यानं दरवाजा उघडला नाही. संबंधित प्रवाशाला कॉकपिटचा पासकोड कसा समजला हा प्रश्न आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार ज्या प्रवाशानं कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तो पहिल्यांदा विमानातून प्रवास करत होता. जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं टॉयलेटचा वापर करायचा असं म्हटलं,त्याचाच दरवाजा असेल, असं वाटल्याचंही त्यानं सांगितलं. जेव्हा विमानातील क्रू मेंबर्सनी त्यानं कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगताच तो शांतपणे माघारी निघून गेला.
