ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी याआधीदेखील ऐन दिवाळीत जवळपास महिनाभर आंदोलन केलं होतं. त्यांच्या संपामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा तालुका आणि जिल्ह्यांशी थेट संपर्क तुटला होता. आजही बहुसंख्य ठिकाणी एसटी ही वाहतुकीचं प्रमुख स्त्रोत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा आजही प्रवासाचं महत्त्वाचं साधन हे एसटी बस आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता तेव्हा अनेक गाव-खेड्यांमधील नागरीक हवालदिल झाली होती. जिल्ह्यातून गावाला जाणं खूप खर्चिक झालं होतं. कारण खासगी वाहनांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते.
एसटी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. आता जर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्याचा मोठा फटका ग्रामीण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. तसेच शहरातून दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनादेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असणार आहे.
