मुंबईसह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजाचे रविवारी रात्री नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यंदा लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी तब्बल 33 तास लागले. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला होता. यानंतर तो मजल दरमजल करत रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यानंतर दीड-दोन तासांत लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja) विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, सुमद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्याने लालबागचा राजाचे सकाळी दहा वाजता होणारे विसर्जन रात्री 9 वाजता झाले. हा संपूर्ण काळ लालबागचा राजा समुद्रातच बसून होता. शनिवारी सकाळी दहाच्या आसपास समुद्राला मोठी भरती आली. तोपर्यंत लालबागचा राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली होती. भरती आल्यानंतर समुद्राचे पाणी झपाट्याने वाढत गेले. त्यामुळे लालबागचा राजाची जवळपास अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली होती.
यावेळी लालबागचा राजाच्या मूर्तीसोबत जे कार्यकर्ते आणि इतर भक्त होते, त्यांच्या जवळपास छातीपर्यंत समुद्राचे पाणी आले होते. या काळात समुद्राच्या लाटाही जोरात उसळत होत्या. काहीवेळा समुद्राच्या लाटांचे पाणी डोक्यावरुन जात होते. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला समुद्रातच ठेवून माघारी किनाऱ्यावर आले. समुद्राला भरती असल्याने इतर भक्तही मूर्तीच्या जवळ जायची हिंमत करत नव्हते.
त्यावेळी कोळी बांधवांनी मात्र लालबागचा राजाची साथ सोडली नाही. कोळी समाजातील काही तरुण मुलं लालबागचा राजाच्या मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होती. हे सर्वजण लालबागचा राजाचे आसन आणि चारही बाजूंना कोंडाळे करुन होते. या सर्वांनी लालबागचा राजाची मूर्ती विसर्जनापूर्वी समुद्रात वाहून जाणार नाही किंवा सरकणार नाही, यासाठी घट्ट धरुन ठेवली होती. एक वेळ अशी आली की समुद्राचे पाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या कंबरेच्या वरपर्यंत पोहोचले. तेव्हाही एक-दोन कोळी बांधव लालबागचा राजाच्या मूर्तीसोबत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासाठी कोळी बांधवांचे कौतुक केले जात आहे. गेली अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांकडून गेले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात लालबागचा राजाच्या विसर्जनसाठी तराफा वापरला जात होता. हा तराफा कोळी बांधवांच्या बोटींकडून ओढला जात असे. मात्र, यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुजरातवरुन एक हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला स्वयंचलित तराफा आणला होता. त्यामुळे लालबागचा राजाचा तराफा ओढण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींची गरज राहिली नव्हती. मात्र, काल समुद्राला भरती आल्यानंतर मोठा गाजावाजा करुन आणलेला हा स्वयंचलित तराफा पूर्णपणे कुचकामी ठरला होता आणि लालबागचा राजाचे विसर्जन 12 तासांनी लांबणीवर पडले होते.
