आधीच विकलेल्या आणि आधीच तारण ठेवलेल्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनेरा बँकेत तारण ठेवत त्याद्वारे 117 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्य बँकेची फसवणूक करणाऱ्या अमित अशोक थेपाडे याला सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने रविवारी मुंबईत अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात ‘ईडी’ला यश आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमित अशोक थेपाडेच्या गॅलक्सी कन्स्ट्रक्शन आणि मिस्टॉम एन्टरप्रायजेस दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मालकीच्या काही अचल मालमत्ता होत्या. मात्र, यातील काही मालमत्तांची त्याने विक्री केली होती, तर काही मालमत्ता तारण ठेवल्या होत्या; परंतु कर्जाची उचल करण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांद्वारे कॅनरा बँकेकडे या मालमत्ता तारण ठेवल्याचं उघड झालं आहे.
छापेमारीत काय सापडलं?
दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून अमित अशोक थेपाडेला अटक करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून तो या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्याच्या अटकेदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच्या रूममधून 50 पेक्षा जास्त बँक खात्यातील साडेनऊ लाखांची कागदपत्रे, सोने, 2 कोटी 33 लाख रुपयांचे हिरे, दोन वाहने, डिजिटल उपकरणे आदी मुद्देमाल जप्त केला. ईडीच्या विशेष न्यायालयाने अमित अशोक थेपाडेला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.








