मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ (ऑनलाईन). यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना अशी वंदे भारत एक्सप्रेस यापूर्वी धावत होती. या सेवेचा विस्तार करण्यात आला असून आजपासून नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. याचा उद्घाटन सोहळा पार पडला.
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे.
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘ वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
वेगवान, सुरक्षित, आरामदायी व सोयीस्कर प्रवास
मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून सुरू होणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.
नांदेड- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे फायदे
मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण होईल. इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. गाडीचे डबे 8 वरून वाढवून 20 करण्यात आले असून, प्रवासी आसन क्षमता 530 वरून 1440 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा या वंदे भारत एक्सप्रेसमुळं मिळेल. हुजूर साहिब नांदेडहून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना उत्कृष्ट व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. वारंवार प्रवास करणारे प्रवासी, भाविक, कर्मचारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त आहे. पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होणार आहे.
नांदेड-मुंबईचं वंदे भारत एक्सप्रेसचं एसी चेअर कारचं तिकीट 1610 रुपये आहे. जेवण न घेतल्यास त्यातून 364 रुपये कमी होऊन ते 1246 रुपये होईल. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं तिकीट 2930 रुपये असून जेवन न घेतल्यास त्यातून 419 रुपये वजा झाल्यास ते 2511 रुपये होईल. नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस पहाटे 5 वाजता सुटेल ती दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट बुकिंग 28 ऑगस्टपासून तर मुंबई- नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट 27 तारखेपासून बुक करता येईल.
मुंबई ते नांदेड वंदे भारतच्या एसी चेअर कार प्रवासाचं तिकीट 1775 रुपयांना असेल. यातून 530 जेवणाचे वजा केल्यास ते 1240 रुपयांवर येईल. तर, एक्झ्युकेटिव्ह चेअर कारचं तिकीट 3125 रुपये आहे. त्यातून 613 वजा केल्यास ते 2512 रुपयांवर येईल. मुंबईतून नांदेडला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1 वाजता सुटेल ती रात्री 10.50 वाजता पोहोचेल.
