इंग्लंडचा फलंदाज जो रुट कसोटीमध्ये सर्वाधिक धावा कऱणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यापासून फक्त काही पावलं तो दूर आहे. यादरम्यान आता स्वत: सचिनने त्याच्या या रेकॉर्डवर भाष्य केलं आहे. सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा करत जागतिक विक्रम केला आहे. तथापि, 13 हजार 543 धावांसह रूट दुसऱ्या स्थानावर असून हा अविश्वसनीय टप्पा गाठण्यापासून फक्त 2378 धावा दूर आहे. रेडिटवरील आस्क मी एनीथिंग (एएमए) सत्रादरम्यान, सचिनला जो रुटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया होती? असं त्याला विचारलं. तसंच, त्याने आता 13 हजार कसोटी धावा ओलांडल्या आहेत आणि तो तुझ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने तुझ्याविरुद्ध त्याचा पहिला सामना खेळला आहे असंही सांगण्यात आलं. यावेळी सचिनने इंग्लंड क्रिकेट संघाच्या अनुभवी स्टारचं कौतुक केलं.
सचिनने प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, “13 हजार धावांचा टप्पा ओलांडणं ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि तो अजूनही धैर्याने ती करत आहे. 2012 मध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा नागपूरमध्ये त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाहिले तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना ते इंग्लंडच्या भावी कर्णधाराला पाहत आहेत असं सांगितलं होतं. तो ज्या पद्धतीने विकेटचे मूल्यांकन करत होता आणि ज्याप्रमाणे स्ट्राइक रोटेट केला ते पाहून मी जास्त प्रभावित झालो. मला त्याच क्षणी तो एक मोठा खेळाडू होणार हे कळलं होतं,” असं सचिन म्हणाला.
