प्रभादेवीमधील बहुचर्चित एल्फिस्टन पूल पाडण्याला अखेर मूहूर्त मिळाला आहे. हा ब्रिटिशकालीन पूल 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. म्हणजेच गणेशोत्वसानंतर पूलाचं पाडकाम सुरु होणार आहे. स्थानिक आणि दुकानदारांच्या विरोधामुळे वारंवार ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या पुलासोबत परिसरातील काही इमारतीही पाडल्या जात आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याची आणि त्यानंतर पाडकाम कऱण्याची मागणी केली होती. त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पूल बंद केला जाणार आहे. हा पूल पाडून तिथे डबलडेकर पूल उभा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर तीन दिवसांनी पूल बंद केला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पूल लवकरात लवकर पाडण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात पूल पाडला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने 10 सप्टेंबर तारीख निवडल्याचं वाहतूक विभागाने सांगितलं आहे.
एल्फिस्टन पूल परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. पऱळ येथून सिद्धिविनायक मंदिर, दादर, लोअर परळ, वरळीला जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो. तसंच प्रभादेवी येथून दादर पूर्व, लालबाग, शिवडी, परळ व्हिलेज येथे जाण्यासाठी हा पूल वापरला जातो. त्यामुळेच जर हा पूल बंद केला तर करी रोड आणि दादरमधील पुलांवर अतिरिक्त भार पडणार आहे. त्याचं नियोजन करणं वाहतूक विभागासाठी मोठी कसरत असणार आहे, कारण येथून रोज हजारोंच्या संख्येने वाहनं जातात. दरम्यान वाहतूक विभागाने याची तयारी केल्याची माहिती आहे.
परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पुल हा कायमच रहदारीचा मार्ग ठरला आहे. एल्फिस्टन पूलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पुल पूर्णत: बंद करा अशी स्थानिकांची मागणी आहे. स्थानिकांनी जोरदार निदर्शने करत काम बंद पाडलं होतं. वाहतूक विभागाने आता नवी तारीख जाहीर केल्यानंतर स्थानिक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
