बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. या काळात मोठ्या उत्साहाना घराघरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. कोकणात तर गणेशोत्सवाचा वेगळाच थाट आहे. लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी निघाले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यात आली आहेत. अशातच वंदे भारत एक्स्प्रेसबाबत एक महत्त्वाची माहीती समोर येतेय.
मुंबई ते मडगाव वंदे भारत आठ डब्यांची चालवण्यात येत होती. मात्र आता गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्स्प्रेस तब्बल 16 डब्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळं ऐन गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. वंदे भारतचे हे बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
16 डब्यांची ही वंदे भारत एक्स्प्रेस 25,27,29 ऑगस्ट रोजी मुंबई सीएसएमटीहून आणि 26,28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून धावणार आहे. ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेने हा निर्णय घेतल्याने लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई-मडगाव वंदे भारत या स्थानकांत थांबते
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटल्यानंतर ती दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबा असेल. ही वंदे भारत सीएसएमटी येथून पहाटे 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 1.15 वाजता गोव्यातील मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या मार्गावर मडगाव, गोवा येथून दुपारी 2.35 वाजता सुटेल आणि 10.25 वाजता मुंबईतील सीएसएमटी येथे पोहोचेल.
1) 16 डब्यांच्या वंदे भारतमुळे चाकरमान्यांना काय फायदा होईल?
16 डब्यांमुळे प्रवाशांची क्षमता वाढेल, ज्यामुळे ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होईल.
2) वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटांचे बुकिंग कसे करावे?
तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट (https://www.irctc.co.in) किंवा रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडकीवर संपर्क साधू शकता.
3) वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ काय आहे?
मुंबई ते मडगाव: पहाटे 5:25 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुपारी 1:15 वाजता मडगाव येथे पोहोचेल.
मडगाव ते मुंबई: दुपारी 2:35 वाजता मडगावहून सुटेल आणि रात्री 10:25 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
