कोल्हापुरात पंचगंगा नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठली आहे. आणखी चार इंचाने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर पंचगंगा धोका पातळी गाठणार आहे. सध्या पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी 42 फूट आठ इंच इतकी आहे. तर जिल्ह्यातील 79 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणखी अलर्ट मोडवर आलं आहे.. आंबेवाडी आणि चिखली नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातून शियेकडे जाणाऱ्या मार्गावर देखील पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (Kolhapur Rain Updates)
Pandharpur Chandrabhaga River:उजनी व वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती; शहरातील शंभर कुटुंबांचे प्रशासनाने केले स्थलांतर
उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चंद्रभागा पात्रा नजीक असणाऱ्या अंबिका नगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने शंभर कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कालपासून उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी केलेली आहे. सध्या उजनी धरणात 1 लाख 77 हजार क्युसिक विसर्ग आणि पाणी येत असल्याने धरणातून सध्या एक लाख 31 हजार 600 क्युसेक निसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात थोडी कपात केली असून जवळपास 25 हजार क्युसेक विसर्ग ने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर येथे होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेची इशारा पातळी 443 मीटर इतकी असून सध्या नदीतून ४४३.१८ मीटर एवढी पाणी पातळी झाली आहे. पंढरपूर शहराची धोका पातळी 445 मीटर असून पाण्यात अजून वाढ झाल्यास शहराला महापुराचा धोका उद्भवणार आहे. याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील 42 नदीकाठच्या गावांनाही प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असून शेकडो हेक्टर वरची पिके सध्या पाण्याखाली गेलेली आहेत.
Sangli Rain Krishna River: सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली
सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 42 फुटांवर पोहोचली आहे. चांदोली पाठोपाठ कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढण्याचा वेग कमी झाला. धोका पातळी असलेल्या 45 फुटांच्या वर पाणीपातळी जाऊ न देण्याचा सांगली पाटबंधारे विभागाकडून प्रयत्न आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवरून ११ फुटापर्यंत खाली आणले आहेत. कोयना धरणातून एकूण ८२,१०० क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे. चांदोली धरणातील विसर्ग कमी करून 15369 क्युसेक इतका विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
