लोकसभेला ज्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले होते ते माजी खासदार संजयकाका पाटील, विद्यमान खासदार विशाल पाटील आणि नुकतेच काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले पृथ्वीराज पाटील एका कार्यक्रमात गप्पागोष्टीत रंगलेले दिसून आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निमित्त होते सन 1998 साली आसाममधील बोडो अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील बुधगावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल प्रकाश बाबुराव पाटील यांनी शौर्याने लढत वीरमरण पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ बुधगाव ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकार्पण सोहळ्याचे. यावेळी व्यासपीठावर आजी माजी खासदार आणि पृथ्वीराज पाटील व्यासपीठावर एकत्र होते. यावेळी तिघांमध्ये गप्पांचा फड रंगला.
अजित पवार जयंत पाटील एकाच व्यासपीठावर
दरम्यान, शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार आज एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. इस्लामपूर शहरामध्ये आज (16 ऑगस्ट) हा कार्यक्रम होणार आहे. इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कट्टर विरोधक आज इस्लामपूरमध्ये एका व्यासपीठावर
सरोज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना रितसर निमंत्रित केले आहे. आता यामध्ये कोण कोण नेते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहतात आणि उपस्थित नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगणार का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. दुसरीकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात. आता हे दोन नेते उपस्थित राहणार असल्याने जयंत पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये हा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जयंत पाटील देखील उपस्थित राहणार हे निश्चित मानले जाते. रोहित पवार जर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावर आले तर सध्याचे राजकीय परिस्थितीतील कट्टर विरोधक इस्लामपूरमध्ये एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळतील.
काही जणांना वाटतं, आपण लईच मोठे झालो आहोत
दुसरीकडे, रोहित पवार यांनी काका अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचे म्हटले होते. आता या बोचऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हायजॅक आरोपावरून अजितदादांनी दुसऱ्यांच्या पक्षांमध्ये नाक खूपसण्याची गरज नाही असा टोला रोहित पवार यांना लगावला. आज (16 ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, काही जणांना वाटतं, आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचा बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खूपसण्याची गरज नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.
