मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीत रुळांची दुरुस्ती, सिग्नल सिस्टमचे देखभाल काम तसेच इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. परिणामी काही लांब पल्ल्याच्या तसेच लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून ब्लॉक
शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार-ठाणे आणि कल्याण-कसारा मार्गावर ब्लॉक राहणार आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावर तानशेत स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम होणार असून, हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.30 पासून रविवारी पहाटे 5.15 पर्यंत चालेल. विद्याविहार-ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर देखील शनिवारी रात्री 12.40 ते रविवारी पहाटे 4.40 या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या दरम्यान मध्य रेल्वेच्या अप-डाउन मेल-एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि लांब पल्ल्याच्या गाड्या साधारण 15-20 मिनिटे उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
बोरीवली ते गोरेगाव दरम्यान रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गिकांवर ब्लॉक राहणार आहे. यामुळे या वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर काही गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. अप-डाउन जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरीवली लोकल हार्बरमार्गे गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक ते बदल लक्षात घेऊन तुम्ही खोळंबा होऊ नये यासाठी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
