नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रुद्र’ या गाजलेल्या आसामी चित्रपटात (Aasami Movie) सुरभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिनी कश्यप (Actress Nandini Kashyap) हिला पोलिसांनी ‘हिट अँड रन’ (Hit And Run Case) प्रकरणात अटक केली आहे. गुवाहाटी पोलिसांनी (Guwahati Police) सांगितलं की, नंदिनी कश्यपच्या (Nandini Kashyap) गाडीनं एका 21 वर्षीय मुलाला चिरडलं होतं. 29 जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नंदिनीला अटक करण्यात आली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण नलबारी पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी होती आणि गुवाहाटी महानगरपालिकेत अर्धवेळ काम करत होती.
मीडिया रिपोर्टनुसार, 25 जुलै रोजी गुवाहाटीच्या दखिंगगाव भागात ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव समीउल हक असं आहे, तो नलबारी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. तो एका गरीब कुटुंबातील होता आणि गुवाहाटी महानगरपालिकेत नोकरी करून त्याच्या अभ्यासाचा खर्च भागवत होता, अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी पहाटे 3 वाजता तो घरी परतत होता. त्यावेळी एका भरधाव वेगानं येणाऱ्या स्कॉर्पिओ कारनं त्याला चिरडलं. सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्री नंदिनी कश्यप ती स्कॉर्पिओ गाडी चालवत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर नंदिनी त्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि गाडी घेऊन पळून गेली. समीउल हकसोबत त्यावेळी त्याचे मित्रही होते, त्यापैकी काही मित्र अभिनेत्रीचा पाठलाग करत काहिलीपारा येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले, जिथे नंदिनी कथितपणे तिची गाडी लपवण्याचा प्रयत्न करत होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ते अभिनेत्रीशी वाद घालतानाही दिसत आहेत.
गंभीर दुखापतीमुळे तरुणाचा मृत्यू
अभिनेत्रीनं गाडीनं चिरडल्यानंतर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्याच्या दोन्ही पायांना अनेक फ्रॅक्च झालेले. मांडी आणि हाताची हाडं तुटलेली. त्याला सर्वात आधी गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी उशिरा त्याचा आयसीयूमध्ये मृत्यू झाला. कुटुंबियांनी सांगितलं की, नंदिनीनं सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं. पण, कधीही मदत केली नाही.
गुवाहाटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अभिनेत्री नंदिनी कश्यपला हिट-अँड-रन प्रकरणात अटक केली आहे. यापूर्वी आम्ही फक्त तिची चौकशी केली होती, कारण सुरुवातीला हा खटला जामीनपात्र कलमांखाली दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काल म्हणजेच मंगळवार, 29 जुलै रोजी संध्याकाळी पीडितेचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत, आम्ही या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील जोडला, जो जामीनपात्र नाही.
नंदिनी कश्यप आहे तरी कोण?
नंदिनी कश्यप कोण आहे? नंदिनी कश्यप ही आसामी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री. दिग्दर्शक रूपक गोगोई यांच्या अलिकडच्या हिट चित्रपट ‘रुद्र’मध्ये सुरभीची मुख्य भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर 52.5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं खरं नाव निकिता आहे आणि ती गुवाहाटीची आहे. तिनं तिचं शालेय शिक्षण अमिनगाव येथील फॅकल्टी हायर सेकेंडरी स्कूलमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर 2021 मध्ये मेघालयातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केली.
