रविवारी 27 जुलै रोजी कुठे बाहेर जाण्याचा प्लान करत असला तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराहाबेर पडा. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी असा हा ब्लॉक असणार आहे. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. तर अनेक लोकल रद्द केल्या जाणार आहेत. तसेचत लोकल उशीराने धावणार आहेत.
ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डातील सर्व मार्ग आणि दिवा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर असा असेल ब्लॉक
ठाणे ते कल्याण स्थानकाव अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.5 पर्यंत अभियंत्रीकी कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावर धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
