उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका हिंदू तरुणीने आपलं जबरदस्ती धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तिने आपल्यासोबत घडलेला सगळा धक्कादायक घटनाक्रम उलगडला आहे. पीडितेने दावा केला आहे की, खोटं प्रेम आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. यानंतर पद्धतशीरपणे इस्लाम स्विकारण्यासाठी मानसिक आणि शारिरीक शोषण करण्यात आलं.
पीडितेने छांगूर बाबा आणि त्याच्या ठिकाणांची नावं घेतली आहे. तिचा आरोप आहे की, फैजान उर्फ अक्षय तिला अनेकदा गोंडा आणि छांगूर बाबांच्या ठिकाणांवर घेऊन गेला. तिथे तिला इस्लाम साहित्य वाचवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तिथे उपस्थित लोकांनी तिच्यावर वारंवार दबाव टाकला की, जर फैजानशी लग्न करायचं असेल तर इस्लाम स्विकारावा लागेल.
तरुणीचा दावा आहे की, त्या ठिकाणांवर तिच्यावर काळी जादू करण्यात आली, जेणेकरुन ती मानसिकरित्या हतबल होऊन इस्लाम स्विकार करेल. पीडितेचा आरोप आहे की, छांगूर बाबाच्या निकट असणारे एका नेटवर्कप्रमाणे काम करतात, जे विशेष करुन हिंदू तरुणींना लक्ष्य करतात.
पीडितेना सांगितलं आहे की, फैजान जेव्हा तिला भेटला होता तेव्हा आपलं नाव अक्षय सांगितलं होतं. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. फैजान आणि इतर तरुणांकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसा आणि महागड्या गाड्या होत्या. त्यावरुन त्यांना फंडिंग मिळत असल्याचा संशय आहे. तिने दावा केला आहे की, फैजानच्या संपर्कात इतर हिंदू तरुणीही होत्या. त्यांचं ब्रेनवॉश करुन त्यांनाही धर्मांतरणासाठी तयार केलं जात होतं.
आरोप आहे की, फैजानने लग्नाचा आमिष देत अनेक वर्षं तरुणीवर बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी तिला औषधं देण्यात आली आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. विरोध केल्यानंतर प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर टाकू असं ब्लॅकमेल करण्यात आलं.
