बीड जिल्हा कारागृह (Beed Jail) मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीतील सदस्य याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आल्याने या जेलची राज्यभरात चर्चा रंगली होती. आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा केलाय.
अंबादास दानवेंचा दावा
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली. याबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केलाय. कृषी विभागात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालेला आहे. आताही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
शिरसाट-मिसाळ वादावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
दरम्यान, सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याची बैठक घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र धाडले. तर माधुरी मिसाळ यांनी देखील पत्र पाठवत संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, त्याच खात्याचे मंत्री बैठक घेऊ शकतात. एवढेच नाही काम असेल तर दुसऱ्या खात्याचे मंत्री देखील बैठक घेऊ शकतात. जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात. मात्र धोरण काय ते त्यांना माहिती नाही. ही लोकशाहीमधील यंत्रणा आहे. याला स्वीकारली पाहिजे. सिस्टीम आहे, याला स्वीकारले पाहिजे, दोघांनी पत्र लिहिणे ही चूक आहे. फोन करून किंवा भेटून बोलले पाहिजे होते. रेकॉर्डवर पत्र लिहिणे हे योग्य नाही. कॅबिनेट मंत्र्यांना आपले अधिकार राज्यमंत्र्याकडे असावे, असे वाटत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
