भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आपल्या चार सहकाऱ्यांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे “ड्रॅगन” अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर यशस्वीरीत्या उतरले आहे. सुमारे 18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर त्यांनी अनेक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले आहे.
शुभांशू शुक्ला 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते. ते अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले. अखेरीस, हे सर्व अंतराळवीर आज 15 जुलै रोजी पृथ्वीवर पोहोचले.
सध्या, अंतराळयान समुद्रात उतरल्यामुळे सर्व अंतराळवीरांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि अंतराळ प्रवासामुळे शरीरावर झालेल्या परिणामांपासून त्यांना सावरण्यासाठी पुढील 10 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुभांशू शुक्ला भारतात परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर अंतराळात
दरम्यान, अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची अॅक्सिओम-4 या मोहिमेसाठी निवड झाली होती. 41 वर्षांपूर्वी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून भारताचे राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवास केला होता. यानंतर शुभांशू यांचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरणार आहे. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. हे 2027 मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारतात अंतराळवीरांना गगनयात्री म्हणतात. त्याचप्रमाणे रशियामध्ये त्याला कॉस्मोनॉट म्हणतात आणि चीनमध्ये त्याला तैकोनॉट म्हणतात. 6 जुलै रोजी आयएसएस स्टेशनवरून शुभांशू यांचे काही फोटो समोर आले. ज्यामध्ये शुभांशू क्युपोला मॉड्यूलच्या खिडकीतून पृथ्वीकडे पाहत असल्याचे दिसून आले होते.
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर आहेत आणि त्यांना 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. आपल्या 18 दिवसांच्या अंतराळ प्रवासात त्यांनी 60 पेक्षा अधिक शास्त्रीय प्रयोगांमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये भारताचे 7 महत्त्वाचे प्रयोगही समाविष्ट होते. त्यांनी अंतराळात मेथी आणि मूग या बियांचे निरीक्षण व अभ्यास केला आहे.
