अहिल्यानगरमधून एक संतापजनक बातमी येत आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीतील केडगाव परिसरात एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, मंगळवारी सकाळी कोतवाली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांच्यात यापूर्वी विवाद किंवा भांडण झालं होतं. याच कारणावरून एका आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला, तर उर्वरित तीन आरोपींनी तिला मारहाण करून गंभीर जखमी केलं. विशेष म्हणजे, आरोपी हे पीडितेचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एक आरोपी ताब्यात, तीन जण फरार
मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश उर्फ टाटा चव्हाण या चौघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी यापैकी डाळखुष काळे या आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हॉटेल मॅनेजरकडून ग्राहकाला मारहाण
दरम्यान, कामरगाव शिवारातील श्रीगुरूदेव हॉटेलमध्ये एका ग्राहकाला केवळ काउंटरवर उभे राहिल्याच्या कारणावरून मॅनेजरकडून मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुबोध किशोर मावले (28, रा. इंदूर, सध्या रा. हिंजवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते रविवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजता श्रीगुरूदेव हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबले होते. दरम्यान, हॉटेलच्या काउंटरवर काही वेळ टेकून उभे असताना, तेथील मॅनेजरने त्यांना टेबलवर बसून घेण्याचा सल्ला देताना उद्धत भाषेत बोलायला सुरूवात केली. फिर्यादीने नम्रपणे तुम्ही नीट बोलावं असे सांगताच, मॅनेजरचा संताप अनावर झाला. त्याने शिवीगाळ करत, समोर पडलेला लोखंडी पाइप उचलून फिर्यादीला मारहाण केली. तसेच, तू इथून निघून जा, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली आणि हात धरून हॉटेलबाहेर हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
