पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागाील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. कोकणकडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आलं आहे. मृतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. यामुळे आता या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, (वय 40 वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर रुपाली संतोष खुटाण आंबोली (ता. जुन्नर) असं मृत महाविद्यालयीन तरूणीचं नावं आहेत. जुन्नर पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठिण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुंटूबातील सदस्यांकडून पोलिस देण्यात आली होती अशी माहिती देखील समोर आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांकडून या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते, ते बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता.
पांढऱ्या गाडीमुळे अन् दरीच्या कठड्यावरील चपलांमुळे संशय
जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या. रविवारी (22 जून) रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. काल (सोमवारी 23 तारखेला) सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला असता, रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
