Search
Close this search box.

Nashik Rain Update : फक्त तासाभराच्या जोरदार पावसाने नाशिक तुंबलं, गुडघाभर पाण्यातून वाहने चालवण्याची वेळ, गोदावरीच्या पाणीपातळीतही वाढ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा (Rain) जोर वाढलेला आहे. सकाळपासूनच नाशिकच्या (Nashik News) अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांना पावसामुळे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वाहन चालकांना गुडघाभर पाण्यातून आपली वाहने चालवावी लागत आहेत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून रामकुंड आणि गोदा घाट परिसरात पुरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने आज नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन सज्ज, वाहतूक विस्कळीत

जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पावसाच्या जोरामुळे शहरातील वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली असून, सकाळी शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये पोहोचताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पाऊस

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गावातील सखल भागात पावसाचे पाणी साचले. तासाभराच्या पावसामुळे रस्त्यांना अक्षरक्षः नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाल्याचे दिसून आले.

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस

दरम्यान,  19 जून रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 20 ते 22 जून या कालावधीत या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें