राज्यभरात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये (17 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4 मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात 73.7 मिमी, मुंबई शहर 62.9 मिमी, रायगड 54.1 मिमी आणि पालघर जिल्ह्यात 49.7 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
काल कुठे किती पावसाची नोंद झाली?
राज्यात कालपासून आज 17 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिमीमध्ये) : ठाणे – 73.7, रायगड – 54.1, रत्नागिरी – 47.7, सिंधुदुर्ग – 12.7, पालघर – 49.7, नाशिक – 7.7, धुळे – 7.1, नंदुरबार – 4, जळगाव – 6.7, अहिल्यानगर – 1.1, पुणे – 11.9, सोलापूर – 0.9, सातारा – 19.7, सांगली – 6, कोल्हापूर – 17.8, छत्रपती संभाजीनगर – 0.6, जालना – 0.1, बीड – 0.7, लातूर – 0.1, धाराशिव – 1.6, नांदेड – 3.6, परभणी – 1.7, हिंगोली – 3.6, बुलढाणा – 3.5, अकोला – 8.7, वाशिम – 8.5, अमरावती – 9.4, यवतमाळ – 8.7, वर्धा – 7.6, नागपूर – 0.9, गोंदिया – 0.2, चंद्रपूर – 11.9, गडचिरोली – 5.2
राज्यभरात कुठे किती नुकसान?
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर 100 मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहतूक नेरळे-माणगाव-मणेरी-चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन, स्लॅब पडून दोन आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. (Rain)
कोल्हापुरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फूट 10 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तर कुंभी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. भोगावती, पंचगंगा आणि कुंभी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
