अभिनेते किरण माने आपल्या अभिनय गुणांसोबतच सामाजिक भान आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणताही सामाजिक, राजकीय विषय असो ते आपलं बोलणं परखडपणे मांडत असतात. गेल्या वर्षभरात त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. सोशल मीडियातील त्यांच्या अनेक पोस्ट चर्चेचा विषय बनतात. एखाद्या विषयावर किरण मानेंची प्रतिक्रिया काय असेल? याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. अशातच किरण मानेंनी 25 एप्रिल रोजी 3 वाजण्याच्या सुमारास एक पोस्ट केली. ज्याखाली त्यांचे चाहते काळजी करु लागले होते. काय आहे ही पोस्ट? यानंतर किरण मानेंनी त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय? जाणून घेऊया.
नेमकी पोस्ट काय ?
किरण माने यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी आयकर विभागाचा फोटो शेअर केला. यावर ‘निमंत्रण आलंय… जाऊन येतो. सविस्तर वृत्तांत लवकरच कळवतो.जय शिवराय… जय भीम!’ अशी कॅप्शन दिली. फक्त तासाभरात या पोस्टवर अडीचशेहून अधिक कमेंट्स आल्या. हजारो जणांनी या पोस्टवर रिअॅक्ट केलंय तर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली.
या पोस्टनंतर किरण मानेंच्या चाहत्यांनी त्यांना ऑल द बेस्ट असं म्हटलंय. ‘सच बोलने का इनाम. तुम्हाला अधिकारी चहा पाजतील व सांगतील एवढं खरं बोलत जावू नका.’, अशी कमेंटही एकाने केलीय. ‘चांगले तपास करा म्हणावं त्यांला…पण तरीही मी सत्यता मांडणारच म्हणावं’, अशी प्रतिक्रियाही देण्यात आलीय. ‘अभिनंदन सर तुम्ही आता मोठे झाले. तुम्हालापण निमंत्रण आलं राव’, असेही एकाने म्हटलंय. यासोबच ‘काळीज घ्या’ अशाही अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.
किरण मानेंचं स्पष्टीकरण
पोस्टवर चाहत्यांचे प्रेम पाहून किरण मानेंनी पुढच्या तासाभरातच दुसरी पोस्ट टाकून शंका दूर केली. आपण आयकर विभागात चीफ कमिशनर ऑफ इनकम टॅक्स राज टंडन यांच्यासोबत असल्याचे त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले. ‘निमंत्रण आहे भावाबहीणींनों… सन्मानाने
काळजी नसावी. जय शिवराय… जय भीम!’ अशी पोस्ट त्यांनी केली.
