महाकाल सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून (Mahakaal Superfast Express) प्रवास करणाऱ्या एका महिलेने प्रवासात आपला 8 जणांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. महिला इंदोर ते गोविंदपूरी (Indore to Govindpuri) प्रवास करत होती. महिला आपली मुलगी आणि भावासह प्रवास करत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेने सगळा घटनाक्रम शेअर केला आहे. यामध्ये तिने कशाप्रकारे आपल्यावर शाब्दिक अत्याचार आणि छळ करण्यात आला याबद्दल सांगितलं आहे.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये महिलेने सांगितलं आहे की, पुरुषांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली, अश्लील भोजपुरी गाणी गायली आणि ट्रेन संत हृदयराम नगरला येईपर्यंत प्रवासात त्यांचा छळ सुरूच ठेवला. “8 गुंड पुरुषांच्या एका गटाने माझ्या नम्रतेवर कमेंट करायला सुरुवात केली, अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली, अश्लील भोजपुरी गाणी गाऊ लागली आणि संत हृदयराम नगरपर्यंत मला त्रास देत राहिले!” असा संताप महिलेने व्यक्त केला आहे.
मानसिक धक्का बसलेल्या महिलेने पुरुषांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “हे खरंच रक्षक आहेत का?,” अशी विचारणा तिने केली आहे. महिलेच्या दाव्यानुसार, तिने रेल्वे सेवा ट्विटर हँडलच्या माध्यमातून आरपीएफकडे तक्रार दाखल केली होती. पण ट्रेन अखेरच्या स्थानकावर पोहोचल्यानंतरच आरपीएफ कर्मचारी आले. निराश झालेल्या महिलेने म्हटलं की, “माझा कोच बी-3, सीट 44 आहे. मी अशा प्रकारचा मानसिक छळ पचवू शकत नाही!”
महिलेने सांगितलं आहे की, टीसीने मदत करण्याच्या नावाखाली फक्त तिलाच शांत करण्याचा प्रयत्न केला. “ते कशाप्रकारे माझा छळ करत आहेत आणि चप्पल दाखवत आहेत पाहा. टीसी तर फक्त नावाला होता. त्याला फक्त माझं तोंड बंद करायचं होतं,” असं महिलेने सांगितलं.
महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या स्थानकावर पोहोचल्यानंतर पायऱ्या चढताना महिलेला त्यांच्या चप्पल दाखवून टोमणे मारताना कैद झाले आहेत.
या घटनेनंतर भारतीय रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रेल्वे पोलिसांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेची दखल घेतल्याचं सांगितलं आहे. तक्रार दाखल केली असून संबंधित पुरुषांची ओळख पटविण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्यासाठी तपास सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
