अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांवर अमेरिकेने लादलेल्या टेरिफचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसत आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कामध्ये जशास-तसं धोरणानुसार भरमसाठ वाढ करण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजाराचा कारभार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शेअर बाजार 4000 पॉइण्ट्सने पडला. आज शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरत असल्याचं चित्र पहिल्या काही मिनिटांमध्येच स्पष्ट झालं आहे. बाजार सुरु झाल्यानंतर हजारो कोटींचा काही मिनिटांत चुराडा झाला असून छोट्या गुंतवणुकदारांचं दिवाळं निघाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच असं घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात एकाच वेळी पडझड झाली आहे.
कारभार सुरु झाला अन्…
निफ्टीमध्ये 1100 अंकांची पडझड पाहायला मिळाली. निफ्टीचा कारभार 21800 अंकावर सुरु झाला. तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये जवळपास 4000 अंकांची पडझड होईल असा अंदाज होता मात्र बाजारात कारभार सुरु झाला तेव्हा तो 3915 अंक घसरणीसहीत सुरु झाला. आज दिवसभाचा कारभार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 71900 अंकावर होता. बँक निफ्टीमध्ये 2000 अंकांची पडझड दिसून आली. निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्समध्ये 3400 अंकांची पडझड झाली असून तो सध्या 47249 च्या आसपास आहे. इंडिया व्हीआयएक्स 56 टक्के तेजीत आहे.
सर्वाधिक फटका टाटाच्या शेअर्सला
शुक्रवारी कारभार बंद झाला तेव्हा ज्या स्तरावर सेन्सेक्स होता त्यामध्ये 3915 अंकांच्या पडझडीसहीत उघडला. आज दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 71449 अंकावर होता. निफ्टी 1146 अंकांनी पडून 21758 अंकांवर उघडला. बँक निफ्टी 2166 अंकांनी पडून 49336 वर सुरु झाला. रुपयाच्या दरामध्येही 50 पैशांची पडझड झाली असून रुपयाचा दर 85.74 प्रति डॉलर इतका आहे. निफ्टी 50 चे सर्व शेअर्समध्ये पडझड दिसत आहे. सुरुवातीला भारती एअलटेल हा एकमेवर स्टॉक सकारात्मक होता. मात्र तो सुद्धा नंतर पडला. सर्वाधिक पडझड ही टाटाच्या शेअर्समध्ये झाली आहे. टाटा स्टील, ट्रेंट, टाटा मोटर्स हे निफ्टीवरील सर्वाधिक फटका बसलेले स्टॉक्स आहेत.
