एरव्ही रविवार म्हटलं की रेल्वे मार्गांवर असणाऱ्या मेगाब्लॉकमुळं लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होणार ही बाब स्पष्ट असते. मात्र आता शनिवारीसुद्धा पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री उशिरा 1.30 वाजल्यापासून रविवारी (30 मार्च) पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक लागू असेल. दरम्यानच्या काळात अंबरनाथ ते बदलापूरमधील रेल्वेसेवा प्रभावित होणार आहे. ब्लॉक काळात अंबरनाथ ते कर्जतदरम्यान कोणतीही लोकलसेवा सुरू राहणार नाही, तर काही रेल्वेसेवा कमी- जास्त प्रमाणात रद्द केल्या जातील.
लोकल सेवांमध्ये शनिवारी रात्री 11.13 मिनिटांनी निघणारी परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत जाणार असून 11.51 वाजता निघणारी सीएसएमटी- बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे.
12.12 (शनिवारी मध्यरात्री) वाजता निघणारी सीएसएमटी कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत धावेल. तर, 2.30 वाजता निघणारी कर्जत- सीएसएमटी लोकल अंबरनाथहून 3.10 (पहाटे) सुटेल. रविवारी पहाटे कर्जत ते सीएसएमटी ही विशेष लोकल चालवण्यात येणार असून, कर्जतहून ही ट्रेन 4.10 वाजता (पहाटे) निघून सकाळी 6.08 वाजता सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सर्वाधिक परिणाम
मध्य रेल्वेच्या या विशेष ब्लॉकमुळं लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे, या ट्रेनची यादी खालीलप्रमाणे…
- भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
- विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- हुसैन सागर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस
- होस्पेट- सीएसएमटी एक्स्प्रेस
- चेन्नई- सीएसएमटी एक्स्प्रेस या सर्व रेल्वेगाड्या कर्ज- पनवेल आणि दिवामार्गे वळवण्यात येतील.
कल्याणनजीकच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या रेल्वेगाड्यांना ठाण्यात थांबा देण्यात आला आहे. याशिवाय ब्लॉक काळात इतरही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर रेल्वे प्रशासनाचं लक्ष असेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली.
याव्यतिरिक्त सिकंदराबाद- राजकोट एक्स्प्रेस ही ट्रेन वांगणीला (पहाटे) 4.10 ते 4.30 वाजता थांबवली जाईल. तिरुनेवेली- दादर एक्स्प्रेस ही ट्रेन (पहाटे) 4.17 ते 4.27 ही दहा मिनिटं नेरळ स्थानकात थांबवली जाईल. याशिवाय इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रेल्वेमार्गही आवश्यकतेनुसार वळवले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं जारी केली आहे.
